वैज्ञानिकांनी आपल्या आकाशगंगेतील काही जुन्या ताऱ्यांचे आवाज टिपले असून, त्यामुळे आकाशगंगेबाबत नवीन माहिती उपलब्ध होणार आहे. आकाशगंगेचे वस्तुमान व वय यावर त्यातून प्रकाश पडणार आहे. बर्मिगहॅम विद्यापीठाच्या संशोधकांनी म्हटले आहे, की एम ४ तारकासमूहातील ताऱ्यांचे हे आवाज आहेत. हा तारकासमूह १३ अब्ज वर्षे जुना आहे. नासाच्या केप्लर मिशनमधील माहिती वापरून वैज्ञानिकांनी ताऱ्यांच्या सस्पंदित दोलनांची नोंद अभ्यासली आहे. त्या तंत्राला अ‍ॅस्टेरोसिस्मॉलॉजी म्हणतात. ही दोलने ताऱ्यांच्या प्रखरपणात अगदी सूक्ष्म बदल घडवत असतात व ते बदल ताऱ्यांमधील दबलेल्या आवाजामुळे होतात. ताऱ्यांचे हे संगीत जाणून घेतल्यास त्यांचे वय व वस्तुमान कळू शकते. ताऱ्यांच्या या संशोधनातून विश्वाच्या अभ्यासाची एक नवीन खिडकी खुली झाली आहे. तारकीय आवाजांचे आधीचे हे अवशेष विश्वाच्या निर्मितीविषयी माहिती देतात, असे बर्मिगहॅम विद्यापीठाचे आँद्रिया मिग्लियो यांनी सांगितले. आपण ज्या ताऱ्यांचा अभ्यास करत आहोत ते पूर्वीच्या दीर्घिकांमधील अवशेष आहेत. त्यातून सर्पिलाकार दीर्घिकांचे गूढ उलगडणार असून, त्यात आपल्या आकाशगंगेसारख्या दीर्घिकांचाही समावेश आहे. आतापर्यंतच्या संशोधनात अ‍ॅस्टेरोसिस्मॉलॉजी तंत्राने दीर्घिकांतील ताऱ्यांचे वय जास्त अचूकतेने सांगता येते. जसे पुरातत्त्वशास्त्रज्ञ पृथ्वीचे वय उत्खननातून सांगतात तसे अवकाश वैज्ञानिक ताऱ्यांचे वय त्यांच्या अवशेषातून सांगू शकतात. ताऱ्यातील पूर्वीच्या आवाजावरून त्यांची पूर्वीची रचना कशी असेल ते त्यांना उलगडता येते, असे बर्मिगहॅम विद्यापीठाचे प्राध्यापक बिल चाप्लिन यांनी म्हटले आहे. आतापर्यंत ताऱ्यांचे वय हे केवळ तरुण ताऱ्यांपुरते सीमित होते त्यामुळे दीर्घिका खूप आधी कशा होत्या हे कळण्यास मार्ग नव्हता, पण तो आता उपलब्ध झाला आहे असे याच विद्यापीठाचे गाय डेव्हिस यांनी सांगितले.