माजी पर्यावरण मंत्री जयंती नटराजन् यांनी काँग्रेस पक्ष सोडताना केलेल्या आरोपांची दखल घेऊन अर्थमंत्री अरुण जेटली व पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी वादग्रस्त प्रकल्पांची चौकशी करण्याचे संकेत दिलेले असतानाच प्राप्तिकर विभागाने ऑक्टोबर २०१३ मध्ये आदित्य बिर्ला समूहाच्या कार्यालयावर घातलेल्या धाडींसंदर्भातही तपास होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
 या धाडीत प्राप्तिकर विभागाला मिळालेल्या दस्तावेजांची छाननी केली जाण्याची शक्यता आहे. हिंदाल्को कंपनीला झालेल्या कोळसा वाटपप्रकरणी, बिर्ला समुहाने भूमिका बजावली असल्याच्या आरोपासंदर्भात केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाने धाड टाकली होती. या एकूणच हालचालीमुळे या प्रकरणास वेगळे वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.आदित्य बिर्ला समुहाच्या हिंदाल्को कंपनीवर कोळसा खाण वाटप घोटाळ्यासंदर्भात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय)  प्राप्तिकर विभागानेही केलेल्या तपासावर आधारीत अहवाल दिला होता.
त्यातील काही कागदपत्रांत वादग्रस्त नोंदी आढळल्या होत्या. ९ जानेवारी २०१२ ते २ फेब्रुवारी २०१२ या काळात ७.०८ कोटी रुपयांच्या संदिग्ध स्वरूपाच्या १३ नोंदी आहेत. ते पैसे नेमके कोणाला व कशासाठी देण्यात आले याबद्दल खुलासा होऊ शकलेला नाही. हे पैसे माजी पर्यावरण आणि वन मंत्री जयंती नटराजन मिळाले असावेत का, असाही संशय आहे.