भाजप खासदारांनी बुधवारी पहिल्यांदाच सरकारमधील मंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर जाहीरपणे टीका करत आम्ही उपस्थित केलेल्या मुद्द्यांना मंत्री योग्यप्रकारे प्रतिसाद देत नसल्याचे सांगितले. भाजपच्या संसदीय बोर्डाच्या बैठकीत नरेंद्र मोदी आणि संसदीय कामकाज मंत्री वैंक्कय्या नायडू यांच्यासमोर खासदारांनी सरकारमधील मंत्री आम्हाला वेळ देत नसल्याची आणि आमच्या ई-मेल्सना प्रतिसाद देत नसल्याचे गा-हाणे मांडले.
या बैठकीदरम्यान, उत्तर प्रदेशातील भाजपचे खासदार भरत सिंग यांनी मंत्रिमंडळातील मंत्री खासदारांशी तिरस्काराने वागत असल्याचा आरोप केला. तसेच केंद्राच्या अखत्यारीतील प्रकल्प प्रत्यक्ष ठिकाणावर योग्यप्रकारे राबविले जात नसल्याचे सांगितले. त्यांचा मुख्य रोख पंतप्रधान ग्राम सडक योजना आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांकडे होता. यावेळी वैंक्कय्या नायडू यांनी भरत सिंग यांना थांबविण्याचा प्रयत्नही केला. मात्र, इतर खासदारांनी सिंग यांच्या वक्तव्यावर टाळ्या वाजवत मंत्र्यांविषयीच्या नाराजीला वाट करून दिली. भरत सिंग यांनी मंत्र्यांविषयी नाराजी व्यक्त केली असली तरी त्यांनी बैठकीत मोदींच्या नेतृत्वाचे आणि त्यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या उपक्रमांची स्तुती केली.
खासदारांच्या या जाहीर नाराजीविषयी भाष्य करताना वेंकय्या नायडू यांनी खासदार मंत्र्यांच्या कार्यपद्धतीविषयी नाराज असल्याचे मान्य केले. मात्र, त्यांची नाराजी राज्य सरकारवर असल्याचा दावा नायडू यांनी केला. उत्तर प्रदेशमध्ये खासदारांना केंद्र सरकारचे प्रकल्प आणि कल्याणकारी योजना राबविण्यासाठी कोणतीही मदत केली जात नसल्याचेही त्यांनी सांगितले. सरकारकडून हाती घेण्यात आलेल्या कल्याणकारी योजनांसंदर्भात देशातील शेतकरी आणि निम्नस्तरावरील व्यक्तींशी संवाद साधण्यासाठी पक्षाने २६ मे ते १ जूनपर्यंत मोहिम हाती घ्यावी, अशी मागणीही या बैठकीत करण्यात आली.