तीन टॉपर्समुळे अलिकडेच बिहार राज्य चर्चेत आले होते. हे टापर्स कागदोपत्री तर टॉपर्स होते, परंतु विचारलेल्या सोप्या प्रश्नाचेदेखील उत्तर देण्यास असमर्थ होते. हे टॉपर्स नकली असल्याचे उघड झाल्यानंतर बिशुन राय स्कूलची पोलखोल झाली. परंतु, बिहारमधील अन्य शाळांची स्थिती काय आहे यावर चर्चा झाली नाही. दरम्यान ‘इंडियन एक्स्प्रेस’ने बिहारमधील २५ शाळांमध्ये जाऊन शोध मोहिम राबवली. अन्य शाळांची स्थिती ही बिशुन रायपेक्षा भयावह असल्याचे या शोध मोहिमेत समोर आले. काही शाळांमध्ये एकच वर्ग होता, तर काहींमध्ये केवळ दोनच विद्यार्थी नजरेस पडले, काही ठिकाणी वर्गच नव्हेत, तर काही ठिकाणी विद्यार्थी आणि शिक्षक दोघांचा अभाव होता. बिहारमधील ज्या तीन विद्यार्थ्यांच्या टॉप येण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते, त्यात बिशुन रॉय स्कूलची रुबी रॉय सह सौरभ श्रेष्ठ आणि राहुल कुमार यांचा समावेश होता. रुबी रायने एका मुलाखतीत ‘पॉलिटिकल सायन्स’ला ‘प्रॉडिकल सायन्स’ असे संबोधले होते. या विषयात जेवण बनवायला शिकवतात असे धक्कादायक विधान तिने केले होते. अन्य देघांनीदेखील चुकीची उत्तरे दिली होती.
शोध मोहिमेत हाती काय लागले – एक्स्प्रेसच्या रिपोर्टनुसार, २५ शाळांचा दौरा केल्यानंतर आश्चर्यकारक गोष्टी समोर आल्या. मुझफ्फरनगरच्या एका शाळेत कागदोपत्री ८४४ विद्यार्थ्यांची नोंद आहे, परंतु, प्रत्यक्षात दोनच विद्यार्थी शिकायला आले होते. तर अन्य एका शाळेत आवश्यक प्राथमिक सुविधांचादेखील अभाव असल्याचे निदर्शनास आले. संपूर्ण शाळेत केवळ एकच फळा होता. मुझफ्फरनगरपासून १५ किलोमीटर अंतरावरील एका शाळेत तर कोणता वर्गच दिसला नाही. हद्द म्हणजे ही शाळा जेडीयूच्या एका नेत्याची आहे. पनापूरमधील शाळेत गेल्यावर समजले की, ८४४ विद्यार्थ्यांची नोंद असून, ३८४ कला, ३१० विज्ञान आणि १५० वाणिज्य शाखेत शिकत असल्याची नोंद पाहायला मिळाली. प्रत्यक्षात तेथे दोनच विद्यार्थिनी आढळून आल्या. प्रभातनगरमध्ये दोन मजली इमारत आढळून आली. परंतु शाळेची ओळख देणारा एकही बोर्ड येथे पाहायला मिळाला नाही. विद्यार्थी अथवा शिक्षकदेखील नजरेस पडले नाहीत. अन्य एका उच्च माध्यमिक विद्यालयात तर एक कुटुंब राहात होते. आपली मुलगी आणि पती घरात नसल्याचे तेथील महिलाने दरवाजा बंद करत सांगितले.