अमेरिकेच्या फौजा मागे घेण्यात आल्यानंतर इराकमध्ये प्रथमच होत असलेल्या निवडणुकीला बॉम्बस्फोटाचे गालबोट लागले आहे.    युवकांचा प्रामुख्याने वावर असलेल्या बगदाद बिलियर्डस कॅफेमध्ये गुरुवारी रात्री झालेल्या बॉम्बस्फोटात २७ जण ठार झाले आहेत.
या बॉम्बहल्ल्यामुळे शुक्रवारी होणाऱ्या प्रांतिक निवडणुकांच्या विश्वासार्हतेबद्दलच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यापूर्वीच १४ उमेदवार ठार झाले आहेत. राजकीय पेचप्रसंग असतानाही देशातील तिसऱ्या प्रांतात मतदानच झालेले नाही.
या निवडणुका म्हणजे इराकचे स्थैर्य आणि सुरक्षा यांची परीक्षाच आहे आणि त्यामुळे पंतप्रधान नुरी अल-मलिकी यांच्या लोकप्रियतेचीही कसोटी आहे. त्यांच्या पक्षालाच अंतर्गत कलहाने ग्रासले आहे. इराकमधील सुन्नीपंथीय अरब अल्पसंख्य गेले महिनाभर निदर्शने करीत आहेत.
बगदादच्या पश्चिमेकडे असलेल्या अमरियाह या उपनगरात झालेल्या बॉम्बस्फोटात २७ जण ठार झाले आणि ५० हून अधिक जण जखमी झाले. मृतांमध्ये तीन लहान मुले आणि एका महिलेचा समावेश आहे.
एका शॉपिंग मॉलमध्ये असलेल्या दुबई कॅफेमध्ये स्फोट झाला. या कॅफेमध्ये बिलियर्ड आणि व्हिडीओ गेम खेळण्यासाठी प्रामुख्याने युवक येत असतात. या स्फोटाच्या पाश्र्वभूमीवर सुरक्षा रक्षकांनी अमरियाहमध्ये काही र्निबध जारी केले आहेत. या स्फोटाची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारली नसली तरी अल-कायदाशी संबंधित सुन्नी दहशतवाद्यांचा त्यामध्ये हात असल्याचा संशय आहे.