भारत आणि पाकिस्तानमधील संबंध गेल्या दीड महिन्यांपासून अतिशय तणावपूर्ण आहेत. १८ सप्टेंबरला जम्मू काश्मीरमधील उरीतील आर्मीच्या कॅम्पवर हल्ला केला होता. या हल्ल्यात भारताचे १८ जवान शहीद झाले. तर जखमी झालेल्या २ जवानांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. यानंतर भारताने २८-२९ सप्टेंबरच्या रात्री पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राइक केले. या कारवाईत भारतीय जवानांनी दहशतवाद्यांचे कॅम्प उद्ध्वस्त केले. शिवाय ३८ ते ४० दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. मात्र भारताच्या या प्रत्युत्तरानंतर पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे. आतापर्यंत ४० हून अधिकवेळा पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. यामध्ये भारताचे आठ जवान शहीद झालेत तर अठरा नागरिक जखमी झालेत.

वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करणाऱ्या पाकिस्तानने भारताकडूनच शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात असल्याचा आरोप केला आहे. पाकिस्तानकडून केल्या जाणाऱ्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाचा भारताने स्पष्ट शब्दांमध्ये निषेध केला आहे. पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांना बोलावून घेत भारताने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सीमेपलीकडून होणाऱ्या कारवाया रोखल्या जाव्यात, असा संदेश भारताकडून देण्यात आला आहे.

पाच दिवसांमध्ये चार जवान शहीद:
२७ ऑक्टोबर: गुरुवारी सकाळी काश्मीरमधील आरएस पुरा आणि अरनिया सेक्टरमध्ये पाकिस्तान सैन्याने गोळीबार केला. शस्त्रसंधीचे उल्लंघन करुन करण्यात आलेल्या या गोळीबारात एक हेड कॉन्स्टेबल शहीद झाला. त्यांचे नाव जीतेंद्र कुमार असे होते. पाकिस्तानच्या या गोळीबारात कमीतकमी सहा नागरिक जखमी झाले होते.
२५ ऑक्टोबर: आरएस पुरा सेक्टरपासून अखनूर सेक्टरपर्यंत पाकिस्तानने गोळीबर केला. यामध्ये एक शहीद कॉन्स्टेबल झाला. या गोळीबारात सहा वर्षांचा एक मुलगादेखील मरण पावला. सीमा सुरक्षा दलाचे दोन जवान आणि काही महिला, लहान मुलेदेखील या गोळीबारात जखमी झाले.
२४ ऑक्टोबर: आरएस पुरा सेक्टरमध्ये पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचा एक जवान शहीद झाला, तर एक जवान जखमी झाला.
२३ ऑक्टोबर: शनिवारी (२२ ऑक्टोबर) झालेल्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचा गुरुनाम सिंह हा जवान शहीद झाला. सरकारी रुग्णालयात उपचार सुरू असताना गुरुनाम यांची प्राणज्योत मालवली.
१८ ऑक्टोबर: बालाकोट आणि नौशेरामध्ये पाकिस्तानी सैन्याकडून करण्यात आलेल्या गोळीबारात एक जवान शहीद झाला. या जवानाचे नाव सुदेश कुमार होते. सुदेश बालाकोटमधील तरकुंडी भागात तैनात होते.
३ ऑक्टोबर: दहशतवाद्यांनी बारामुल्लामध्ये ४६ राष्ट्रीय रायफल्सच्या कॅम्पवर हल्ला केला. यामध्ये सीमा सुरक्षा दलाचा एक जवान शहीद झाला. तर एक जवान जखमी झाला.
पाकिस्तानकडून आतापर्यंत ४० हून अधिक वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले आहे.