कर्नाटकातील द्रावणगिरी येथून बंगळुरू येथे निघालेल्या एका बसला आग लागल्याने सहा प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. चित्रदुर्गपासून २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या मेतीकुरके गावाजवळ ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत १२ प्रवासी जखमी झाले असून, त्यांपैकी पाच जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
जखमींना चित्रदुर्ग येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर चिंताजनक प्रकृती असलेल्या तिघांना द्रावणगिरी येथे हलवण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. या बसमध्ये ३० प्रवासी होते. आगीचे नेमके कारण कळू शकले नाही, मात्र या बसमधून पेट्रोलची गळती होत होती. त्यामुळेच आग लागली असावी, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.