माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना केंद्र सरकारच्या वतीने राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते भारतरत्न किताब घरी जाऊन सन्मानपूर्वक देण्यात आला. भारतातील हा सर्वोच्च पद्म सन्मान मिळाल्यानंतर त्यांच्या आग्रा जिल्ह्य़ातील बहा तालुक्यात आनंद व्यक्त करण्यात आला. यावेळी मिठाई वाटून त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यात आल्या.
 राष्ट्रपती मुखर्जी यांनी नेहमीचा शिष्टाचार बाजूला ठेवून त्यांना नवी दिल्ली येथील कृष्ण मेनन मार्गावर असलेल्या त्यांच्या निवासस्थानी जाऊन पुरस्कार प्रदान केला.
भाजपच्या मवाळ गटाचे प्रतिनिधित्व करणारे वाजपेयी हे १९९८ ते २००४ या काळात देशाचे पंतप्रधान होते. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत पाकिस्तानशी मैत्रीसाठी पुढाकार घेतला त्यात त्यांनी १९९९ मध्ये ऐतिहासिक लाहोर बस यात्रा केली. त्याचबरोबर पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यासमवेत लाहोर करारावर स्वाक्षऱ्या केल्या. दोन्ही देशात शांतता व सुरक्षेचे वातावरण निर्माण होण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले, पण त्यांच्याच काळात कारगिल युद्ध झाले व त्यात भारतीय लष्कराने विजय संपादन केला. वाजपेयी हे मुत्सद्दी राजकारणी असून त्यांनी राजकीय वर्तुळात सर्वाशी मैत्री राखली होती.