अॅक्सिस बॅंकेच्या एटीएममध्ये भरण्यासाठी घेण्यात आलेली २२.५ कोटी रुपयांची रोकड घेऊन पसार झालेल्या गाडीच्या चालकाला पकडण्यात शुक्रवारी यश आले. दिल्ली पोलिसांनी त्याच्याकडून सर्व रोकड हस्तगत केली आहे.
अॅक्सिस बॅंकेची रोकड दिल्लीतील विविध एटीएम मशीनमध्ये भरण्यासाठी एसआयएस कंपनीबरोबर करार करण्यात आला आहे. या कंपनीकडून रोकड वाहतूक केली जाते. गुरुवारी संध्याकाळी गाडीमध्ये ठेवण्यात आलेली २२.५ कोटी रूपयांची रोकड घेऊन गाडीचा चालक पसार झाला होता. चालकानेच रोकड पळविल्याने बॅंकेचे अधिकारी चक्रावले होते. यानंतर तातडीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आणि पोलिसांनी वेगाने तपासाला सुरुवात केली.
प्रदीप शुक्ला याला शुक्रवारी पहाटे दिल्लीजवळ अटक करण्यात आली. तो मूळचा उत्तर प्रदेशमधला राहणारा असून, काही दिवसांपूर्वीच तो एसआयएस कंपनीमध्ये ड्रायव्हर म्हणून रुजू झाला होता.