केंद्र सरकारने बोगस नोटांचा काळा धंदा बंद करण्यासाठी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या. पण त्यानंतरही बोगस नोटांचा हा उद्योग सुरूच असल्याच्या घटना समोर येत आहेत. दिल्लीतील संगम विहार परिसरातील एका एटीएममधून ग्राहकाला २००० हजार रुपयांची नवी कोरी नोट मिळाली; पण ती ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’ची खरीखुरी नोट नसून ‘चिल्ड्रेन बँक ऑफ इंडिया’ची खेळण्यातील बोगस नोट असल्याचे लक्षात येताच त्या ग्राहकाचे डोळेच पांढरेफटक पडले. या प्रकरणी संबंधिताने परिसरातील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

दिल्लीतील संगम विहार परिसरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये एक तरुण पैसे काढण्यासाठी गेला होता. त्याला आठ हजार रुपये काढायचे होते. एटीएममधून दोन हजार रुपयांच्या चार नोटाही निघाल्या. पण त्या नोटा ‘भारतीय रिझर्व्ह बँके’च्या नोटा नसून ‘चिल्ड्रेन बँक ऑफ इंडिया’च्या नोटा असल्याचे त्याच्या लक्षात आले. या प्रकरणी तरुणाने जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दक्षिण दिल्लीतील एका खासगी कंपनीत कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करत असलेला रोहित कुमार संगम विहार परिसरातील एटीएममध्ये गेला. त्याला दैनंदिन खर्चासाठी पैसै काढायचे होते. त्याने आठ हजार रुपये एटीएममधून काढले. मात्र, एटीएममधून निघालेल्या दोन हजार रुपयांच्या नवीन नोटा या बोगस असल्याचे त्याच्या लक्षात आले. या नोटांवर २००० हा आकडा नव्या नोटेवर असलेल्या फॉन्टसारखाच होता. ही नोट ‘चिल्ड्रेन गव्हर्नमेंट’तर्फे जारी करण्यात येत असल्याचा त्यावर उल्लेख करण्यात आला होता. ‘मै धारक को २००० रुपये अदा करने का वचन देता हूँ’ असेही त्या नोटांवर लिहिण्यात आले होते, अशी माहिती रोहित कुमार याने दिली आहे.

या प्रकरणी परिसरातील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, पोलिसांनीही या घटनेची चौकशी केली. त्यांनी तातडीने एटीएममध्ये जाऊन त्यातून पैसे काढले. त्यांनाही अशा प्रकारच्या बोगस नोटा मिळाल्या. यामुळे पोलिसांनाही धक्का बसला. या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास सुरू आहे. पोलिसांनी संबंधित बँक अधिकाऱ्यांशीही संपर्क साधला आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

दरम्यान, हा प्रकार उघडकीस आल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. जो पंतप्रधान नोटांची छपाई व्यवस्थित करू शकत नाही, तो देश कसा चालवणार, असा सवाल केजरीवाल यांनी केला आहे. पंतप्रधानांनी संपूर्ण देशाची थट्टा चालवली आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.