पंजाबमध्ये एटीएम मशीन फोडणाऱ्या टोळीला लुधियाणा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून १८ विविध बँकांचे ६४१ डेबिट कार्ड, १६६ चेकबुक, ११७ पासबुक, ३ लाखांची रोकड तसेच एक पिस्तुल, १२ काडतुसे, तीन कार आणि ८ मोबाईल फोन जप्त केले आहेत. बँक प्रणालीतील तृटींचा अभ्यास करून त्यांनी एटीएममधून पैसे लंपास करण्याची शक्कल लढवली होती.

पोलिसांच्या माहितीनुसार, या प्रकरणी सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी या दरोडेखोरांकडून स्थानिक वृत्तपत्राचे ओळखपत्रही जप्त केले आहे. आरोपींनी त्यांच्या नातेवाईकांच्या आणि मित्रांच्या नावाने बँकांमध्ये खाती उघडली होती. या खात्यांमध्ये ते चोरलेले पैसे जमा करीत होते. एकदा त्यांना डेबिट कार्ड मिळाले की ते बँकांना लुटण्याची प्रक्रिया सुरु करीत होते. त्यासाठी त्यांची विशिष्ट पद्धत ठरली होती. त्यानुसार हे लोक या नातेवाईकांच्या खात्यातील पैसे एटीएम मशिनमधून काढत, मशिनमधून पैसे बाहेर आल्यानंतर ते एटीएम मशिन बंद करीत असत. त्यामुळे पैसे काढल्याची नोंद खात्यावर होत नसे. त्यांनतर आम्ही पैसे काढले मात्र ते मशिनमधून मिळालेच नाहीत असे बँकेत सांगत, त्यामुळे बँक त्यांच्याखात्यावर पैसे जमा करीत असे. अशा प्रकारे त्यांनी अनेक बँकांना चुना लावला आहे. अशी माहिती  पोलीस आयुक्त आर. एन. ढोके यांनी दिली आहे.

एटीएम मशिन्स फोडून त्यातून मिळालेला पैसा हे दरोडेखोर विविध गोष्टीत गुंतवत होते. त्यासाठी त्यांनी हे पैसे विविध ठिकाणी घरे, महागड्या गाड्या, जमीनी खरेदी करून गुंतवले होते. पोलिसांनी ताब्यात घेतलेले आरोपी हे सराईत असून गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्यावर एटीएम फोडल्याचे अनेक गुन्हे दाखल आहेत.

याप्रकरणी पोलिसांनी बँक कर्मचाऱ्यांकडे आपला मोर्चा वळवला असून यात त्यांचा सहभाग असल्याशिवाय या चोऱ्या शक्य नसल्याचे पोलिसांचे म्हटले आहे.