नोटाबंदीनंतर अनेकांच्या अडचणीत वाढ झाल्याचे चित्र निर्माण झाले होते. बॅंकांसमोर आणि एटीएम समोर लांबच लांब रांगांमुळे सामान्य नागरिक त्रस्त झाल्याचेही आपण पाहिले. पंरतु कंटाळून एखादी व्यक्ती एटीएममध्ये गेली आणि तिने मागितलेल्या रकमेच्या अनेक पट रक्कम त्याला मिळाली तर? असेच काहीसे झाले टोंक येथील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ असलेल्या एटीएममध्ये.

या एटीएमने १०० च्या नोटाऐवजी २,००० च्या नोटा दिल्या. त्यामुळे ग्राहकांनी मागितलेल्या रकमेच्या वीस पट रक्कम त्यांना मिळू लागली. नोटा काढण्यासाठी आलेल्या ग्राहकांना हा प्रकार समजताच त्यांनी पटापट नोटा काढल्या. नुकताच सरकारने एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा १०,००० रुपये केली आहे. बघता बघता ही बातमी टोंकमध्ये वाऱ्यासारखी पसरली आणि काही तासांतच ६,००,००० रुपये लोकांनी काढले.

हे कसे झाले?

एटीएम मशीनमध्ये प्रत्येक नोटांसाठी वेगळे कप्पे असतात. त्या-त्या कप्प्यांचा एक सांकेतिक क्रमांक असतो. विशिष्ट मूल्याच्या नोटा विशिष्ट कप्प्यामध्ये टाकणे हे बॅंक कर्मचाऱ्याचे काम असते. जर समजा चुकून १०० च्या कप्प्यात ५०० रुपयाची नोट गेली किंवा ५०० च्या कप्प्यामध्ये २००० ची नोट गेली असेल तर त्याचे सोयरसुतक एटीएम मशीनला नसते. ते केवळ दिलेल्या सूचनांचे पालन करते. एटीएम जेव्हा ग्राहकाला रोख काढण्याबद्दल विचारते तेव्हा त्यानंतर ग्राहक आपल्याला हवी असलेली किंमत एटीएममध्ये टाकतो. एका विशिष्ट अॅलगॉरिदमद्वारे आपल्याकडे उपलब्ध असलेल्या नोटा ग्राहकाला कशा द्यायच्या याची सूचना एटीएमला मिळते. नोटांच्या संख्येची बेरीज करुन वेगवेगळ्या मूल्यांच्या नोटा देण्याचे काम एटीएम करते.

असेच टोंकच्या बॅंक ऑफ बडोद्याच्या एटीएममध्ये झाले. जेव्हा ग्राहकांनी ५०० रुपये काढण्याची सूचना दिली तेव्हा एटीएमने त्यांना २००० च्या पाच नोटा दिल्या. ज्या लोकांनी १००० रुपये काढण्याची सूचना एटीएमला दिली तेव्हा एटीएमने त्यांना २००० च्या १० नोटा दिल्या. हैदराबाद येथील शमशाबाद विमानतळावर देखील असाच प्रकार घडला होता. १०० रुपयांच्या नोटांच्या कप्प्यांमध्ये बॅंक कर्मचाऱ्याने ५०० रुपयांच्या नोटा टाकल्या होत्या.

बॅंक पुढे काय करेल?

ज्या लोकांनी पैसे काढले आहेत त्यांना अर्थातच हे पैसे परत करावे लागणार आहेत. कारण बॅंकेजवळ असणाऱ्या डेटाबेसच्या आधारावर बॅंक त्यांच्या विथड्रॉल स्टेटमेंटची तपासणी करेल. ज्या ग्राहकांनी जास्त पैसा काढला आहे त्यांना नोटीस पाठविण्यात येईल, असे बॅंक अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. तेव्हा आपल्याला जास्त पैसे मिळाल्याचा आनंद हा अल्पकाळच टिकणारा असेल.