पेशावर येथील शाळेवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाकडून सर्व राज्यांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. देशातील शाळा, हॉटेल्स, मॉल्स आणि सार्वजनिक ठिकाणी सुरक्षेत वाढ करण्याची सूचना गृहमंत्रालयाकडून राज्यांना देण्यात आली आहे.
पेशावर येथे तालिबान्यांच्या हल्ल्यानंतर भारतातील सुरक्षा व्यवस्थेबाबत बोलताना केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सर्व राज्यांना सतर्क करण्यात आल्याची माहिती दिली. तसेच शाळेवर दहशतवादी हल्ला झाल्यास त्यावर मात करून विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर कसे पडता येईल? ओलिस असताना परिस्थिती कशी हाताळावी? आणीबाणीच्या वेळी अलार्म सुरू करून शाळेचे प्रवेशद्वार आणि इतर मार्ग कसे बंद करावेत? याचा तात्काळ योजना तयार करण्यास सांगण्यात आल्याची माहिती गृहमंत्रालयातील अधिकाऱयांनी दिली.
याआधी २६/११ हल्ल्याचा आरोपी डेव्हिड हेडली याला अटक झाल्यानंतर २०१० साली सर्व राज्यांतील शाळा आणि शैक्षणिक संस्थांना दहशतवादी हल्ल्याचा सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. सध्याची पेशावर येथील परिस्थिती लक्षात घेता आणि प्रजासत्ताक दिनाला अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा भारत दौऱयावर येत असल्यामुळे राज्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दिल्ली, मुंबईतील अग्रगण्य शाळा आणि शैक्षणिक संस्था, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश येथील स्थानिक शाळांना विशेष सुरक्षा देण्यात येणार असल्याचे देखील अधिकाऱयांनी सांगितले.