ईश्वरनिंदा व दहशतवादाचा गुन्हा दाखल

पाकिस्तानातील दक्षिण सिंधमध्ये एका मंदिराची मोडतोड करण्यात आली. यात ईश्वरनिंदा व दहशतवाद अशा दोन आरोपांखाली अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे पोलिसांनी सांगितले.

या मंदिरातील मूर्तीची मोडतोड करून त्याचे भाग गटारीत टाकून दिलेले सापडले. थत्ता जिल्ह्य़ातील घारो शहरात हा प्रकार घडला आहे. ‘डॉन’ या वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार मंदिरांच्या मोडतोडीबाबत पोलिसांनी अज्ञात व्यक्तींच्या विरोधात ईश्वरनिंदा व दहशतवादाचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पुढील तपास सुरू असून अद्याप कुणाला अटक करण्यात आलेली नाही, असे पोलिस अधिकारी फिदा हुसेन मस्तोई यांनी सांगितले. त्यांनी बीबीसीला दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणाच्या सर्व पैलूंची चौकशी केली जाईल. मंदिराजवळ जी पदचिन्हे सापडली आहेत ती बारा वर्षे वयाच्या मुलाची असून स्थानिक हिंदू नगरसेवक

लाल माहेश्वरी यांनी सांगितले की, मी मासिक धार्मिक सेवेचे काम करीत होते. रात्री १ ते पहाटे ५ दरम्यान कुणीतरी मंदिरात आले असावे. जेव्हा सकाळी भाविक मंदिरात प्रार्थनेसाठी आले तेव्हा मूर्ती दिसल्या नाहीत. मंदिराच्या इतिहासात प्रथमच अशी घटना घडली. सिंधच्या अल्पसंख्याक मंत्री डॉ. खट्टो माल यांच्या सल्लागारांनी सांगितले की, हल्लेखोरांना लवकरच अटक केली जाईल. घारो हे ठिकाण राष्ट्रीय महामार्गालगत कराचीपासून ६० कि.मी. अंतरावर आहे. तेथे दोन हजार हिंदू कुटुंबे राहतात.