डीएनए रचनेच्या शोधासाठी वैज्ञानिक फ्रान्सिस क्रीक यांना दिलेले नोबेल पारितोषिकाचे पदक आता लिलावात विकले जाणार आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी ते लिलावात विकण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
नोबेल पारितोषिकाच्या रूपात दिले जाणारे पदक जाहीर लिलावात विकले जाण्याची ही पहिलीच वेळ आहे.
टेक्सास येथील हेरिटेज ऑक्शन कंपनीने म्हटले आहे की, डीएनएचा शोध लावणाऱ्या क्रीक यांचे पदक १० एप्रिलला न्यूयॉर्क येथे होणाऱ्या लिलावात विकले जाईल. त्याला आतापासूनच अडीच लाख डॉलरची पहिली बोली अपेक्षित आहे. डीएनएच्या शोधाची साठी पूर्ण होत असतानाच त्यासाठी दिलेल्या नोबेल पदकाचा लिलाव होत आहे असे क्रीक यांची नात किंड्रा क्रीक हिने सांगितले. १९५३ मध्ये फ्रान्सिस क्रीक व जेम्स डी वॉटसन यांनी डीएनएच्या सर्पिलाकार रचनेचा शोध लावला होता. त्याचा शोधनिबंध नेचर या नियतकालिकात मॉलिक्युलर स्ट्रक्चर ऑफ न्युक्लिइक अ‍ॅसिड- अ स्ट्रक्चर फॉर डिऑक्सिरायबोन्युक्लिइक अ‍ॅसिड या नावाने प्रसिद्ध झाला होता. क्रीक व वॉटसन या दोघांनी डीएनएची रचना उलगडली होती. जनुकीय गुणधर्म असलेला रेणू प्रत्येक पेशीत असतो त्याला डीएनए असे म्हणतात. या शोधात मॉरिस विल्कीन्स यांचाही मोठा वाटा होता त्यामुळे वॉटसन, क्रीक व मॉरिस यांना १९६२ मध्ये वैद्यकशास्त्राचे नोबेल देण्यात आले होते. क्रीक यांच्या कुटुंबीयांनी हे पदक व मानपत्र लिलावात काढल्याची बातमी एबीसी न्यूज रेडिओने दिली आहे. हेरिटेज ऑक्शन कंपनीने म्हटले आहे की, अडीच लाख डॉलरची पहिली बोली अपेक्षित आहे. या शोधाचे श्रेय रोझलिंज फ्रँकलिन या महिलेला मिळायला हवे होते त्यामुळे डीएनएच्या नोबेल पारितोषिकासाठी या तिघांची निवड काही प्रमाणात वादग्रस्त मानली जाते.
या पदक विक्रीतून येणारा पैसा थोडय़ा प्रमाणात लंडन येथे २०१५ मध्ये सुरू  होणाऱ्या फ्रान्सिस क्रीक संस्थेला दिला जाणार आहे असे क्रीक यांच्या कुटुंबीयांनी सांगितले. क्रीक यांची नात किंड्रा हिने सांगितले की, नोबेल पारितोषिकाचा लिलाव केल्याने ते लोकांना पाहायला मिळेल व त्यातून पुढील पिढीला प्रेरणा मिळेल. क्रीक यांना त्यावेळी ८५७३९.८८ स्वीडिश क्रोनर इतकी रक्कम मिळाली होती तो चेक व त्यांचा प्रयोगशाळेत वापरायचा जुना कोटही लिलावात ठेवला जाणार आहे.