म्यानमारमधील रोहिंग्यांवरील अत्याचाऱ्याच्या पाश्र्वभूमीवर विद्यापीठाचा निर्णय

म्यानमारच्या नोबेल पारितोषिक विजेत्या नेत्या आँग सान सू ची या ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या ज्या महाविद्यालयात शिकल्या होत्या त्या महाविद्यालयाने सू ची यांचे चित्र तेथून हटवले आहे. त्याचे निश्चित कारण स्पष्ट करण्यात आलेले नसले तरी म्यानमारमध्ये रोहिंग्या मुस्लिमांवर होत असलेल्या अत्याचारांमुळे तसे करण्यात आल्याचे मानले जात आहे.

ब्रिटनमधील ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या सेंट ह्य़ूज कॉलेजमध्ये सू ची १९६४ ते १९६७ या काळात तत्वज्ञान, राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्राचे शिक्षण घेतले. या महाविद्यालयाने १९९९ मध्ये सू ची यांचे चित्र त्यांच्या आवारात  लावले. चेन यानिंग या कलाकाराने ते चित्र काढले होते. सू ची यांचे पती आणि ऑक्सफर्डमधील प्राध्यापक मायकेल एरिस यांच्या मालकीचे ते चित्र होते. त्यांच्या मृत्यूनंतर ते महाविद्यालयाला देण्यात आले होते.

मात्र आता सू ची यांच्या म्यानमारमधील रखाईन प्रांतातील रोहिंग्या मुस्लिमांवर अत्याचार होत आहेत. रोहिंग्यांचा वंशविच्छेद होत असल्याची टीका अनेक स्तरांतून होत आहे. ५ लाख रोहिंग्यांनी शेजारील बांगलादेशात स्थलांतर केले आहे. या पाश्र्वभूमीवर सू ची यांच्यावर टीका होत आहे. त्यानंतर सू ची यांचे चित्र सेंट ह्य़ूज कॉलेजने त्यांच्या आवारातून काढले आहे. मात्र त्यासाठी स्पष्ट कारण दिलेले नाही.

चित्र हटवण्याचा निर्णय महाविद्यालयाच्या व्यवस्थापन मंडळाने घेतला असल्याचे महाविद्यालयाच्या द स्वान नियतकालिकात म्हटले आहे. तर या महिन्याच्या सुरुवातीलोमहाविद्यालयाला नवे चित्र भेट मिळाले आहे. ते लावम्यासाठी सू ची यांचे चित्र हटवून संग्रहात ठेवले आहे, असे महाविद्यालयाने निवेदनात म्हटले आहे. मात्र त्यामागे रे कारण म्यानमारमधील रोहिंग्यांवरील अत्याचार हेच असल्याचे मानले जात आहे.

बर्मा कँपेन यूके नावाच्या गटाने महाविद्यालयाचे हे कृत्य भ्याड असल्याचे म्हटले आहे. महाविद्यालयाने चित्र काढण्याचे कारण स्पष्टपणे सू ची यांना कळवले पाहिजे. तसेच म्यानमारमधील रोहिंग्यावरील अत्याचार थांबवून त्यांच्या मानवी हक्कांचा आदर करण्यात यावा अशा सूचनाही कराव्यात, असे या गटाचे संचालक मार्क फार्मानर यांनी म्हटले आहे.

सेंट ह्य़ूज कॉलेजच्याच माजी विद्यार्थी असलेल्या लंडनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनीही सू ची यांच्यावर टीका केली आहे. महाविद्यालयाने जून २०१२ मध्ये सू ची यांना मानद पदवी बहाल केली होती. मात्र ती परत घेण्याचा ऑक्सफर्डचा विचार नाही, असे विद्यापीठाने स्पष्ट केले. ऑक्सफर्ड शहराने सू ची यांना १९९७ साली फ्रीडम ऑफ द सिटी नावाचा किताब बहाल केला होता. तो परत घेण्याचा विचार असल्याचे शहराच्या प्रतिनिधींनी म्हटले आहे.