ऑस्ट्रेलियातील होबार्ट येथे भारतीय तरुणावर वर्णभेदातून हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. होबार्टमध्ये झालेल्या या हल्ल्यात भारतीय तरुण जखमी झाला आहे. ‘आम्ही या घटनेची गंभीर दखल घेतली असून देशातील प्रत्येक व्यक्तीच्या सुरक्षेसाठी आम्ही कटीबद्ध आहोत’ अशी ग्वाही ऑस्ट्रेलियाने दिली आहे.

अमेरिकेपाठोपाठ आता ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय तरुणांवर हल्ले सुरु झाले आहेत. होबार्टमध्ये टॅक्सी चालवणारा ली मॅक्स हा तरुण रविवारी शहरातील मॅकडोनल्डबाहेर गाडी घेऊन थांबला होता. यादरम्यान त्याला तीन किशोरवयीन मुलं आऊटलेटमधील कर्मचाऱ्यांशी वाद घालताना दिसले. ली मॅक्सने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता त्या किशोरवयीन मुलांनी मॅक्सवरच हल्ला केला. हल्ला करणाऱ्या मुलांनी मॅक्सला भारतीय असल्यावरुन शिवीगाळही केली. मारहाणीत मॅक्सला दुखापतही झाली होती. घटनास्थळावरुन निघण्यापूर्वी हल्लेखोरांनी त्याच्या जखमेवर पाणी फेकले.

‘होबार्टमध्ये मी गेल्या आठ वर्षांपासून काम करतोय. पण आजवर असा अनुभव आला नव्हता. आणखी एका भारतीय टॅक्सी चालकावर अशाच पद्धतीने हल्ला झाला होता. मात्र त्याने तक्रार दाखल केली नाही’ असे ली मॅक्सने सांगितले. ली मॅक्स हा केरळचा रहिवासी आहे. प्राथमिक उपचारानंतर मॅक्सला घरी सोडण्यात आले. ‘ऑस्ट्रेलियात परदेशातून आलेल्यांविषयी राग वाढला आहे. कदाचित हा ट्रम्प इफेक्ट असू शकतो’ अशी भीतीही त्याने बोलून दाखवली. ऑस्ट्रेलियाच्या दुतावासाने या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. ली मॅक्सला घरी सोडण्यात आले असून सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे असे दुतावासाने म्हटले आहे. तसेच ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या सुरक्षेसाठी सरकार कटीबद्ध आहे असे ऑस्ट्रेलियाच्या भारतातील दुतावासाने सांगितले.

ऑस्ट्रेलियात भारतीयावर हल्ला झाल्याची ही दुसरी घटना आहे. गेल्या आठवड्यात मेलबर्नमध्ये एका चर्चमध्ये फादर टॉमी मॅथ्यू यांच्यावर हल्ला झाला होता. हिंदू किंवा मुस्लिम व्यक्ती चर्चमध्ये प्रार्थनेत सहभागी होऊ शकत नाही असे ओरडत हल्लेखोराने मॅथ्यू यांना लक्ष्य केले होते. मॅथ्यू हेदेखील केरळचेच रहिवासी आहेत.