ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये शॉपिंग मॉलवर विमान कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या दुर्घटनेत विमानातील पाच जणांचा मृत्यू झाला असून विमान अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

मंगळवारी सकाळी मेलबर्नमधील विमानतळावरुन एका छोट्या विमानाने टेक ऑफ केले. मात्र उड्डाणाच्या काही वेळातच विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाला. उड्डाण केल्याच्या अर्धा तासानंतर विमान एका शॉपिंग सेंटरवर कोसळले. शॉपिंग सेंटर बंद असल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र विमानातील पाचही जणांचा मृत्यू झाला आहे. विमानातील सर्व जण गोल्फ खेळण्यासाठी निघाले होते. मृत प्रवासी हे अमेरिकेतून आलेले पर्यटक होते. यामध्ये अमेरिकेतील तपास यंत्रणा एफबीआयचे एजंटचाही समावेश असल्याचे स्थानिक प्रसारमाध्यमांनी सांगितले. वैमानिक मॅक्स क्वार्टरमन हे ६३ वर्षाचे असून त्यांना विमान चालवण्याचा दांडगा अनुभव असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. या अपघाताची हवाई वाहतूक सुरक्षा प्राधिकरणामार्फत चौकशी केली जाईल असे पोलिसांनी सांगितले. मेलबर्नमध्ये गेल्या तीन दशकातील सर्वात भीषण विमान अपघात असल्याचे अधिका-यांनी म्हटले आहे.