एकीकडे उत्तरेच्या वाऱ्यांनी संपूर्ण भारत देश ‘गारेगार’ झाला असताना, ऑस्ट्रेलियामध्ये मात्र अत्यंत खडतर आणि कडकडणाऱ्या तापमानाचा कहर सुरू झाला आहे. येथील तापमान इतके वाढत चालले आहे की, हवामान खात्याला आपली तापमान मोजण्याची यंत्रणा आणखी सक्षम करावी लागत आहे.
उच्च तापमान दर्शविण्यासाठी संपूर्ण देशातील हवामान खात्याने वेगळी रंगयंत्रणा तयार केली आहे. येत्या काही दिवसांत ऑस्ट्रेलियामधील तापमान ५० अंशांच्या पुढे जाण्याची शक्यता असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. चढय़ा तापमानामुळे ऑस्ट्रेलियामध्ये भीषण स्थिती निर्माण झाली असून वणव्यामुळे हजारो घरांना धोका निर्माण झाला आहे. मोठय़ा संख्येने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. येत्या काही दिवसांत तापमान आधीचे सर्व विक्रम मोडून वर जाणार असल्याची भीती हवामान खात्याचे प्रमुख डेव्हिड जोन्स यांनी स्पष्ट केले.  ५२ ते ५४ हे तापमान दर्शविण्यासाठी हवामान खात्याने गुलाबी रंग निवडला आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियामधील तापमान ५० अंशाइतके फार थोडय़ा वेळा झाले होते. १९६० साली दक्षिण ऑस्ट्रेलियामध्ये ५०.७ अंश इतकी विक्रमी नोंद झाली होती. यंदा तापमान उच्चांकी असेल.  

जागतिक तापमानवाढीचा फटका
साऊथ वेल्स या ऑस्ट्रेलियातील सर्वाधिक लोकसंख्येच्या भागामध्ये शेकडो वृक्ष वणव्याच्या तडाख्यात नष्ट झाले आहेत. त्यामुळे हजारो घरांना आगीच्या संकटाशी झुंजावे लागत आहे. जागतिक तापमानवाढीचे दूरगामी परिणाम ऑस्ट्रेलियाला भोगावे लागत असल्याचे पंतप्रधान ज्युलिया गिलार्ड यांनी सांगितले. तापमानवाढीचे उपाय तातडीने योजले नाहीत, तर भविष्य आणखी रखरखीत होईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

ऑस्ट्रेलियाई तापमान
संपूर्ण ऑस्ट्रेलिया खंड हा भारतासारखाच हवामान वैविध्यासाठी प्रसिद्ध आहे. दक्षिण भाग हा अधिक तापमानाचा म्हणून ओळखला जातो. देशाचे सर्वसाधारण कमाल तापमान ४२ अंश सेल्सियस तर किमान तापमान १४ अंश सेल्सियसमध्ये नोंदले गेले आहे. क्वीन्सलॅण्ड व व्हिक्टोरिया हे भाग अधिक तापमानाचे, तर दक्षिण ऑस्ट्रेलिया, तस्मानिया कमी तापमानाचे म्हणून ओळखले जातात.