काश्मीरमध्ये श्रीनगर शहराचा काही भाग, अनंतनाग व पांपोर वगळता काही ठिकाणी संचारबंदी उठवण्यात आली असून तेथील दैनंदिन जीवन अजूनही विस्कळीत आहे कारण हुरियतच्या नेतृत्वाखालील फुटीरतावाद्यांनी बंदचे आवाहन कायम ठेवले आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले, की काल शुक्रवारच्या नमाजावेळी मोर्चा काढण्यात येणार होता, तो रोखण्यासाठी अनेक ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली होती पण आज ती अनेक ठिकाणी उठवण्यात आली. श्रीनगर शहरात नौहाटा, खन्यार, रैनावरी, सफाकदल व महाराजगंज तसेच अनंतनाग शहर व पांपोर येथे अजून संचारबंदी लागू आहे. अधिकाऱ्यांनी काल जमिया मशिदीच्या ठिकाणी काढण्यात येणाऱ्या मोर्चामुळे काश्मीरमध्ये संचारबंदी लागू केली होती. काश्मीर खोऱ्यातील किमान ७० ठिकाणी काल चकमकी झाल्या, त्यात १०० जण जखमी झाले असून त्यात ४६ सुरक्षा जवानांचा समावेश आहे. दरम्यान, काल रात्री येथील अपघातात एका मोटरसायकलस्वाराचा मृत्यू झाला. अब्दुल अहमद गनाइ हा मोटरसायकलवर त्याच्या मुलाला घेऊन बदगाम जिल्ह्य़ातील बर्दापुंझु येथून निधाला होता, तो रस्त्यावर लावलेल्या अडथळ्यांवर आदळला त्यात पितापुत्र जखमी झाले होते. गनाई यांचा नंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले. पण हे अडथळे समाजकंटकांनी लावलेले होते. निदर्शकांनी काश्मीर खोऱ्यात हिज्बुलचा कमांडर बुरहान वनी याच्या चकमकीतील मृत्यूनंतर निदर्शने केली. ९ जुलैपासून ही निदर्शने सुरू आहेत. काश्मीर खोऱ्यात पोस्टपेड मोबाइल सेवा चालू असली, तरी मोबाइल इंटरनेट सेवा बंद आहे. प्रीपेडवरील इनकमिंग कॉल सुविधा सुरू करण्यात आली आहे.  दरम्यान, काश्मीर खोऱ्यात लागोपाठ २२व्या दिवशी जनजीवन विस्कळीत राहिले. शाळा, महाविद्यालये व औद्योगिक आस्थापने बंद राहिली. फुटीरतावाद्यांनी त्यांच्या बंदची मुदत ३१ जुलैपर्यंत वाढवली आहे. निदर्शक व सुरक्षा दले यांच्यातील चकमकीत आतापर्यंत ४७ ठार तर ५५०० जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन पोलिसांचा समावेश आहे.

 

हिंसाचाराबाबत अमेरिकेकडून चिंता व्यक्त

वॉशिंग्टन – काश्मीरमधील अलिकडच्या हिंसाचाराबाबत अमेरिकेने चिंता व्यक्त केली आहे, सर्व बाजूंनी शांततामय तोडगा काढण्याचे प्रयत्न करावेत कारण काश्मीरमध्ये तणाव निवळावा, अशी इच्छा असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते जॉन किरबी यांनी सांगितले, की काश्मीरमध्ये सध्याच्या परिस्थितीत सर्व संबंधित बाजूंनी शांततामय तोडगा काढण्याची गरज आहे. आम्ही निदर्शक व काश्मीरमधील सुरक्षा दले यांच्यातील चकमकीची वृत्ते पाहिली आहेत व तेथील परिस्थितीची आम्हाला चिंका वाटते. अमेरिका, काश्मीरमधील हिंसाचाराबाबत भारत सरकारच्या जवळून संपर्कात आहे. तेथील तणाव निवळण्याची गरज आहे. ९ जुलैला काश्मीर खोऱ्यात हिज्बुल मुजाहिद्दीनचा कमांडर बुरहान वानी हा सुरक्षा दलांशी चकमकीत मारला गेला होता. त्याच्याबरोबर इतर दोन दहशतवादीही ठार झाले होते. निदर्शक व सुरक्षा दले यांच्यात गेल्या पंधरा दिवसांहून अधिक काळ चकमकी सुरू असून एकूण ४७ ठार तर ५५०० जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन पोलिसांचाही समावेश आहे.