आपल्या देशातील चित्रपटविषयक सोहळ्यांमध्ये मिळणाऱ्या पुरस्कारांमध्ये तथ्य नसून हे पुरस्कार निव्वळ वशिलेबाजीमुळेच मिळतात, असे पुरस्कार मिळवण्यापेक्षा या प्रकारच्या सोहळ्यांमध्ये नृत्य करून चार पैसे मिळवणे चांगले, असे रोखठोक विचार नव्या पिढीतील अभिनेता अभय देओल याने पणजी येथे शनिवारी मांडले. ‘नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन’ अर्थात एनएफडीसीच्या एका कार्यक्रमात तो येथे बोलत होता. ‘देव डी आणि शांघाय’सारख्या चित्रपटांमधून संयत आणि प्रभावी अभिनय करणाऱ्या अभयला आजवर पुरस्कारांनी हुलकावणी दिली आहे, मात्र त्याला त्याबद्दल खंत नाही. आपल्या देशातील पुरस्कार सोहळे म्हणजे निव्वळ दिखाऊपणा आहे. या सोहळ्यात ज्यांना पुरस्कार मिळणार असतो किंवा एखादे नृत्य करून ज्यांना मानधन मिळणार असते, असेच कलाकार तेथे जातात, त्यांच्याशिवाय या सोहळ्यांमध्ये कोणालाही स्वारस्य नसते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हे पुरस्कार अभिनयाच्या निकषावर नव्हे तर परीक्षकांच्या मर्जीने दिले जातात. ज्यांना हे पुरस्कार मिळतात त्यांच्याकडून या परीक्षकांना अनेक प्रकारे लाभ होतो, ही माहिती मला एका परीक्षकानेच सांगितली आहे, असे सनसनाटी विधान अभयने केले. या परिस्थितीत अशा पुरस्कारांच्या मागे धावण्यापेक्षा तेथे जाऊन नृत्य करून चार पैसे कमावणे केव्हाही चांगले, असे तो म्हणाला.     

पुरस्कारांमध्ये तथ्य नसून हे पुरस्कार निव्वळ वशिलेबाजीमुळेच मिळतात, असे पुरस्कार मिळवण्यापेक्षा या प्रकारच्या सोहळ्यांमध्ये नृत्य करून चार पैसे मिळवणे चांगले – अभय देओल