बिहारच्या निकालानंतर पंतप्रधान कार्यालयाचा फतवा

बिहार विधानसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागल्याने खडबडून जागे झालेल्या पंतप्रधान कार्यालयाने सर्व मंत्र्यांना, उपलब्ध असलेल्या सर्व साधनस्रोतांचा वापर करून राष्ट्रीय लोकशाही आघाडीने हाती घेतलेल्या समाजकल्याणाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याचे आदेश एक फतवा जारी करून दिले आहेत.
पंतप्रधानांचे प्रधान सचिव नृपेंद्र मिश्रा यांच्या स्वाक्षरीने याबाबत १४ नोव्हेंबर रोजी एक आदेश जारी करण्यात आला आहे. सरकार कारभार करण्यास अपयशी ठरले असल्याचा पसरलेला सर्वसाधारण समज दूर करण्याचा प्रयत्न या आदेशाद्वारे करण्यात येत असल्याचे मानले जात आहे.
बिहार निवडणुकीत पराभव पत्करावा लागल्यानंतर उच्च पातळीवर चर्चा झाल्यानंतर हा फतवा जारी करण्यात आला असल्याच्या वृत्ताला सूत्रांनी दुजोरा दिला आहे.
सरकारने घेतलेल्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचावी यासाठी सरकारकडे उपलब्ध असलेल्या सर्व स्रोतांचा सर्व खात्यांनी, विभागांनी योग्य वापर करावा आणि योजना पोहोचविण्याचा प्रयत्न करावा. त्यासाठी संपर्क साधण्याची परिणामकारक रणनीती ठरवावी. त्याचप्रमाणे सर्व महत्त्वाचे निर्णय संकेतस्थळांवर, समाजमाध्यमांवर, प्रसिद्धीपत्रकाद्वारे आणि गरज भासल्यास पत्रकार परिषद घेऊन जनतेपर्यंत पोहोचवावेत, असेही म्हटले आहे.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणे अपेक्षित आहे. विविध योजनांची माहिती वृत्तपत्र, इलेक्ट्रॉनिक माध्यमे आणि समाजमाध्यमे यांच्यापर्यंत पोहोचवावी, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.

तातडीने उपाययोजना करा!
जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यांना वेळेत माहिती उपलब्ध करून देण्यासाठी खात्यांमार्फत तातडीने उपाययोजना आखणे गरजेचे आहे. त्यामुळे सर्व मंत्री आणि ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधितांना योग्य त्या सूचना द्याव्या आणि सरकारी योजना जनतेपर्यंत पोहोचवाव्या, असेही म्हटले आहे.