अयोध्येतील रामजन्मभूमीवरील राम मंदिराच्या वादावर तोडगा निघालेला नसला तरी अयोध्येत अखेर राम मंदिर साकारण्यात येणार आहे. मात्र हे राम मंदिर रामजन्मभूमीपासून काही अंतरावर बांधण्यात येणार असून मंदिराच्या बांधकामाला सुरुवातदेखील झाली आहे.

अयोध्या येथील रामजन्मभूमी-बाबरी मशीद विवादित जागेवर राम मंदिर बांधण्याची मागणी प्रलंबित आहे. हा वाद न्यायप्रविष्ट असून चर्चेद्वारे दोन्ही पक्षांनी तोडगा काढावा असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. वादावर तोडगा निघाला नसला तरी अयोध्येत राममंदिराचे काम वेगात सुरु आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार विवादित जागेपासून काही अंतरावर अमावा मंदिर असून सुमारे तीन एकरच्या विस्तीर्ण जागेवर हे मंदिर वसले आहे. या अमावा मंदिराच्या आवारातच राम मंदिर बांधण्यात येणार आहे. अमावा मंदिराची जागा बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील अमावा इस्टेटची संपत्ती होती. अमावा इस्टेटने ही जागा २००० मध्ये निखिल भारत तीर्थ विकास समितीच्या नावावर केली होती. आता निखिल तीर्थ विकास समितीने अमावा मंदिराच्या आवारातच राम मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला आहे. समितीचे सचिव आणि बिहारचे माजी आयपीएस अधिकारी किशोर कुणाल यांनी या मंदिराविषयी माहिती दिली. फैजाबाद विकास प्राधिकरणाने आमच्या मंदिराच्या बांधकामाला परवानगी दिली असून बांधकामाला सुरुवात झाली आहे असे त्यांनी सांगितले. अमावा मंदिराच्या आवारात १२ मंदिर असून प्रस्तावित राम मंदिरात काचेचा गाभारा असेल. जमिनीपासून ३० फूट उंचीवर गाभारा असेल. या गाभाऱ्याला बुलेटप्रूफ काचेचे संरक्षण कवच दिलेले असेल. या गाभाऱ्याची रचना अशी असेल की रामजन्मभूमीवर येणाऱ्या भक्तांनाही श्रीरामाचे दर्शन होऊ शकेल असे समितीचे सदस्य सांगतात.

मंदिरामध्ये बाळ श्रीरामांची मूर्ती असेल. भारतात राममंदिराची संख्या कमी नाही. पण बाळ रुपातील श्रीरामांची मूर्ती असलेले मंदिर कमी आहेत. या राम मंदिराचे बांधकाम सुरु असले तरी भक्तांना प्रसाद वाटप सुरुदेखील होणार आहे. २ जुलैपासून भक्तांना प्रसाद मिळेल असे समितीचे सचिव कुणाल यांनी सांगितले. आम्ही फक्त श्रद्धेच्या भावनेतून मंदिर बांधत आहोत, आमचा या मागे राजकीय हेतू नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.