भाजपने राम मंदिराच्या मुद्दय़ावर माघार घेतलेली नसून हे मंदिर अयोध्येत ‘इतर मार्गानी’ उभारले जाईल, असे केंद्रीय रसायन राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी सोमवारी सांगितले. भाजप सरकारने राम मंदिराच्या मुद्दय़ावर माघार घेतलेली नाही. हा मुद्दा आमच्या घोषणापत्रात नसला तरी तो आमच्यासाठी आत्मसन्मान व प्रतिष्ठेचा विषय आहे, असे दुहा बिहरा या खेडय़ात एका कार्यक्रमासाठी आलेले अहिर म्हणाले.
या मुद्दय़ावर साधू व महंत त्यांचे काम करीत आहेत आणि हिंदू व मुस्लीम नेतेही सरकारला भेटत आहेत. मात्र जेव्हा होईल तेव्हा अयोध्येत मंदिरच बांधले जाईल, मशीद नाही, हे ठरले असल्याचे अहिर यांनी सांगितले. या विषयावर आणखी प्रश्न विचारले असता ते म्हणाले की, नेहमी राम मंदिराच्या मुद्दय़ावरच बोलत राहणे योग्य नाही. परंतु ते इतर मार्गानी बांधले जाईल हे ठरले आहे, असे सांगून त्यांनी तपशिलात जाणे टाळले.
सरकार ‘सब का साथ, सब का विकास’ या उद्देशाने शेतकरी आणि बेरोजगार यांच्या कल्याणासाठी काम करीत असल्याचा दावा अहिर यांनी केला.