आयुष मंत्रालयाने गरोदर स्त्रियांना दिलेल्या बुकलेटमधल्या सूचनांवरून आता स्पष्टीकरण दिले आहे. नो सेक्स असा कोणताही सल्ला आम्ही आमच्या बुकलेटमध्ये दिला नाही असे आयुष मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. तसेच मांसाहार टाळावा हा सल्ला योग आणि आयुर्वेदात दिला जातोच असेही म्हटले आहे. आमच्या बुकलेटमध्ये योग आणि आयुर्वेद यासंबंधीचे काही नियम आणि माहिती देण्यात आली आहे. फक्त ठळक बातम्या करता याव्यात म्हणून आयुष मंत्रालयाचे नाव पुढे करून नो सेक्सचा मुद्दा या नियमावलीत टाकण्यात आला आहे असे स्पष्टीकरण आता देण्यात आले आहे.

कालच केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या बुकलेटच्या नियमांवरुन मोठी चर्चा रंगली होती. कारण या नियमावलीत गरोदर स्त्रियांनी गर्भधारणा झाल्यावर ज्या सूचना पाळायच्या आहेत त्यासंबंधीची नियमावली देण्यात आली होती. नो सेक्स शिवाय, मांस खाऊ नका, चांगली संगत धरा, चांगले विचार करा, हॉलमध्ये चांगली चित्रे लावा अशाही सूचना यामध्ये देण्यात आल्या होत्या. मात्र या सगळ्या सूचना पाळणे हे फक्त आर्थिक स्तर उंचावलेल्या स्त्रियांसाठीच्याच होत्या असे दिसून आले. ज्यावर टीका झाली. तसेच ज्यांच्या दोनवेळच्या जेवणाची भ्रांत आहे किंवा ज्यांच्या आहारात मांसाहार असतोच अशा स्त्रियांनी काय करायचे? हा प्रश्नही उपस्थित झाला होता. या सगळ्यानंतर आता आयुष मंत्रालयाने कोणतेही नियम किंवा सूचना आमच्या बुकलेटमध्ये नसल्याचे म्हटले आहे.