देशातील मुसलमानांना राजकीय नेत्यांची चलाखी लक्षात आली आहे. मुसलमान आता स्वत:च्या हक्कांसाठी जागरूक झाले आहेत. भावनिक मुद्दयाला हात घालून त्यांना मुर्ख बनवता येणार नाही, असे म्हणत मुस्लिम युवक हा आता गोट्या खेळण्याऐवजी संगणकावर जास्त वेळ असतो, असे वक्तव्य उत्तर प्रदेशचे सांसदीय कार्यमंत्री आजम खान यांनी केले. उत्तर प्रदेश विधानसभेत मुस्लिम आरक्षणावर चाललेल्या चर्चेदरम्यान त्यांनी मुस्लिम समाजाच्या सद्यस्थितीबाबत भाष्य केले.
समाजवादी पक्षाने मुसलमानांना लोकसंख्येनुसार १८ टक्के आरक्षण देण्याचा कधीच शब्द दिला नव्हता. जोपर्यंत घटनेत दुरूस्ती केली जात नाही. तोपर्यंत मुसलमानांना १८ टक्के दूरच ०.१८ टक्केही आरक्षण दिले जाऊ शकत नाही, असे आझम खान यांनी कायदा सुव्यवस्था मुद्यांवरील स्थगन प्रस्तावाच्या चर्चेदरम्यान म्हटले. मुस्लिम समाजाला १८ टक्के आरक्षण देण्याचे आमिष दाखवून समाजवादी पक्षाने जनतेला मुर्ख बनवल्याचा आरोप विरोधी पक्षाचे नेते गयाचरण दिनकर यांनी विधानसभेत केला होता.
बसपने भाजपला हाती धरून तीन वेळा सरकार स्थापन केले. तसेच मायावतींनी गुजरातमध्ये नरेंद्र मोदींसाठी केलेला प्रचार सर्व मुस्लिमांना आता माहीत झाले आहे. बसप सरकारच्या काळात राज्यात अनेक ठिकाणी मुर्त्या बसवण्यात आल्या. अनेक ठिकाणी मोठी उद्याने बनवण्यात आली. परंतु त्याला एकाही मुस्लिम महापुरूषांचे नाव दिले नाही. हे मुसलमानांना हे सर्व कळते. मुस्लिम युवक आता गोट्या खेळत नाहीत तर संगणकावर ते जास्त वेळ असतात, असे खान यांनी म्हटले. कानपूर येथील एका सभेत बसपाचे संस्थापक कांशीराम यांनी अयोध्या वादावर तोडगा काढायचा असेल तर मशिदीच्या जागी शौचालय बनवण्याचा सल्ला दिला होता, असेही त्यांनी या वेळी सांगितले.