मुलगा होण्याची हमी देणाऱ्या योगगुरू बाबा रामदेव यांच्या ‘दिव्य फार्मसी’च्या कथित उत्पादनावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी गुरुवारी राज्यसभेत करण्यात आली. असे उत्पादन बेकायदेशीर असून त्यासाठी उत्पादकाविरुद्ध कठोर कारवाई करावी, असे विरोधी पक्षांचे सदस्य म्हणाले.
सभागृहाचे कामकाज सुरू होताच जद(यू)चे के. सी.  त्यागी यांनी ‘पुत्रजीवक बीज’ असे नाव असलेले एक पाकीट दाखवले. गर्भवती स्त्रीला मुलगा होण्याची हमी देणारे हे औषध आपण दिव्य फार्मसीतून विकत घेतल्याचा दावा त्यांनी केला. हरयाणाचे ‘ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसिडर’ असलेल्या व्यक्तीने अशा उत्पादनाची विक्री करणे बेकायदेशीर व घटनाविरोधी असल्याचे म्हणाले.अनेक विरोधी सदस्यांनी अशा उत्पादनांचा निषेध करून कठोर कारवाईची मागणी केली, तेव्हा हा मुद्दा ‘आयुष’ खात्याशी संबंधित असून, सरकार या प्रकरणी लक्ष घालेल आणि योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी दिले. लोकसंख्येच्या ‘स्त्री-पुरुष’ प्रमाणाबाबत सरकार अतिशय गंभीर असून पंतप्रधान हे स्वत: ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ मोहिमेवर देखरेख ठेवून आहेत असे ते म्हणाले.