पतंजली आयुर्वेद कंपनीचे प्रमुख योगगुरू रामदेव बाबा यांनी आपल्या विशाल कारभाराचा उत्तराधिकारी कोण असेल, याबाबत नवी माहिती जाहीर केली आहे. पतंजलीचा उत्तराधिकारी कोणी व्यापारी असणार नाही. सन्यासी पुरुष आणि महिलाच रामदेवबाबा आणि आचार्य बालकृष्ण यांचा कारभार सांभाळतील, असे रामदेवबाबा यांनी ट्विटद्वारे सांगितले आहे. सध्या पतंजली आयुर्वेद या कंपनीचा सर्व कारभार त्यांचे सहकारी आचार्य बालकृष्ण सांभाळत आहेत. त्यांच्याकडे मुख्य कार्यकारी अधिकारपदाची जबाबदारी आहे. कंपनी समूहाची जबाबदारी सांभाळत असतानाच त्यांना रामदेवबाबा यांचे धाकटे बंधू भरत यादव हे मदत करत आहेत.

पतंजलीने २०२० पर्यंत आपले उत्पादन १ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचवण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. पतंजलीने गेल्या चार वर्षांत सलग १०० टक्के प्रगती केली आहे. यावर्षीही आम्ही याच वेगाने पुढे जात आहोत. पुढील दोन ते तीन वर्षांत ५० हजार कोटी रुपयांपर्यंत उत्पादन वाढवण्याचे लक्ष्य आहे. २०२० पर्यंत एक लाख कोटी रुपयांपर्यंत उत्पादन वाढवण्याचे आमचे लक्ष्य आहे, असे रामदेवबाबांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले होते.

स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन करताना रामदेवबाबांनी सांगितले होते, की ‘आम्ही प्रत्येक वर्षी २५ लाख कोटी रुपयांच्या उत्पादनांची आयात करतो आणि तितकीच रक्कम बहुराष्ट्रीय कंपन्या देशाबाहेर घेऊन जातात.’ विदेशी कंपन्यांवर विसंबून राहणे कमी करायचे असेल तर आपल्याला इनहाऊस प्रॉडक्शन वाढवणे गरजेचे आहे, असेही रामदेवबाबांनी सांगितले.