योगगुरू रामदेवबाबा तसेच श्री. श्री. रविशंकर यांनी त्यांना दिला जाणारा संभाव्य पद्म पुरस्कार नाकारला आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या पाश्र्वभूमीवर रामदेव यांना केंद्र सरकार पद्मविभूषण हा देशातील दुसऱ्या क्रमांकाचा नागरी पुरस्कार देण्याच्या विचारात असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांत झळकले होते. त्यावर रामदेव यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना पत्र लिहून कळवले आहे की, ते संन्यासी असल्याने त्यांनी पुरस्कारांपासून दूर राहिले पाहिजे. त्याऐवजी एखाद्या पात्र उमेदवारास तो पुरस्कार दिला जावा, असे त्यांनी सुचवले आहे. तर रविशंकर यांनी ट्विटरवरून आपला निर्णय जाहीर केला आहे. सरकारने माझ्या नावाचा विचार केल्याबद्दल आभारी आहे. इतर कुणाला सन्मानित केले तर ते मला आवडेल असे रविशंकर यांनी स्पष्ट केले.