रामदेवबाबा हे देशातील नामांकित व्यक्तिमत्व असून, योगगुरुंचा अनेक क्षेत्रात संचार पाहायला मिळतो. योगविद्या शिकविणऱ्या रामदेवबाबांनी पतंजलिला ब्रॅण्डचे रुप प्राप्त करून दिले. टीव्हीवर योग विद्या शिकविण्याबरोबरच अन्य राजकीय घडामोडींमध्येदेखील विशेष रुची ठेवणाऱ्या रामदेवबाबांचा पतंजली ब्रॅण्ड अनेक क्षेत्रात कार्यरत आहे. त्यांनी हरिद्वार येथे एका विद्यापीठाची स्थापना केली असून, आगामी सत्रात आपल्या विद्यापीठात विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा म्हणून जाहिरातदेखील प्रसिध्द केली आहे. विद्यापीठाच्या संकेतस्थळानुसार, परमपूज्य स्वामी रामदेव आणि सन्माननीय आचार्य बालकृष्ण यांच्या एक उत्कृष्ट शिक्षण केंद्र स्थापनेच्या कल्पनेचा हा परिणाम आहे. जे सर्व प्रकारच्या ज्ञानाचे आणि वैज्ञानिक तर्कांचे मिळते-जुळते रुप आहे. सोमवारी पतंजली विद्यापीठाने अनेक वृत्तपत्रांमधून जाहिरात प्रसिध्द केली. तरुण विद्यार्थी ज्यांना पदवी आणि पदव्युत्तर स्तराचे उच्च शिक्षण प्राप्त करायची इच्छा आहे, त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी असल्याचे या जाहिरातीत म्हटले आहे. विद्यापीठ भारतात आणि परदेशात विद्यार्थ्यांना २५,००० ते ५०,००० रुपयांपर्यंत मासिक पगाराची नोकरी देईल असे देखील या जाहिरातीत म्हटले आहे. सध्या विद्यापीठाद्वारे चालविण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमात योग विज्ञान, संस्कृत साहित्य आणि एमए, योगा थेरपीमध्ये प्रमाणपत्र अभ्यासक्रम यांचा समावेश आहे. पतंजली विद्यापीठाच्या जाहिरातीत शिक्षक भरतीसाठी उमेदवारांकडूनदेखील अर्ज मागविण्यात आले आहेत. या विश्वविद्यालयात प्रवेश प्राप्त करण्यासाठी १२ वीला कमीतकमी ६५ टक्के मार्क असणे गरजेचे आहे. प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम तारीख ३१ जुलै निश्चित करण्यात आली आहे.