दिल्ली पोलिसांची न्यायालयात माहिती

भारतातील काही युवक हे १९९२ च्या बाबरी मशीद पाडण्याच्या व नंतर २००२ च्या गोध्रा दंगलीनंतर आशियातील अल काईदामध्ये (अल काईदा इन इंडियन सबकंटीनंट- एक्यूआयएस) सामील झाले, असे दिल्ली पोलिसांनी न्यायालयात सांगितले.

दिल्लीतील विशेष न्यायालयात दिल्ली पोलिसांनी १७ आरोपींवर आरोपपत्र दाखल केले; त्यानंतर पोलिसांनी सांगितले की, आरोपींचा उद्देश जिहाद हा होता व त्यासाठी ते पाकिस्तानात गेले व तेथे जमात उद दवाचा प्रमुख हाफिझ सईद याला भेटले. लष्कर-ए-तोयबाचा हाफिझ सईद तसेच झाकी उर रहमान यांच्यासह अनेक दहशतवाद्यांना ते भेटले. जिहादी भाषणे देताना सय्यद अनझार शहा याला पकडण्यात आले होते, नंतर तो महंमद उमर याला भेटला व त्यांची चर्चा गोध्रा व बाबरी मशिदीच्या मुद्दय़ावर झाली होती. सय्यद शहा याच्या विचारांनी उमर प्रभावित झाला होता व त्यातच त्याने जिहादसाठी वाहून देण्याचे ठरवले. शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण घेण्याची तयारीही त्याने दर्शवली होती, असे पोलिसांनी अतिरिक्त सत्र न्यायाधीश रितेश सिंग यांच्यापुढे सांगितले. उमर हा त्या वेळी पाकिस्तानातून काम करीत होता. पोलिसांनी सांगितले की, अटक केलेला अब्दुल रहमान याने पाकिस्तानी दहशतवादी सलीम मन्सूर व सज्जाद यांना सुरक्षित आश्रय दिला होता व ते दोघे जैश ए महंमदचे होते. ते नंतर २००१ मध्ये उत्तर प्रदेशातील चकमकीत मारले गेले. बाबरी मशीद पाडल्याचा सूड घेण्यासाठी हे तीन दहशतवादी भारतात आले होते व त्यांनी अयोध्येतील राममंदिर उडवण्याचा कट आखला होता, पण ते मारले गेले असे आरोपपत्रात म्हटले आहे. पोलिसांनी आरोपपत्रात १७ आरोपींची नावे घेतली असून त्यातील १२ फरारी आहेत. या दहशतवाद्यांवर अल कायदा संघटना आशियात स्थापन करण्यास मदत करणे, त्यासाठी तरूणांची भरती करणे असे आरोप ठेवले आहेत. महंमद असीफ झफर, मसूद महंमद अब्दुल रेहमान, सय्यद अन्झार शहा व अब्दुल सामी यांच्यावर बेकायदा कारवायांबाबत आरोप ठेवले आहेत.