बाबरी मशीद प्रकरणात शिवसेनेचे माजी खासदार सतीश प्रधान यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयाने बुधवारी जामीन मंजूर केला. २० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

बाबरी मशीद प्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार सीबीआयच्या विशेष न्यायालयात रोज सुनावणी सुरु आहे. सतीश प्रधान हे मंगळवारी सुनावणीसाठी गैरहजर होते. सतीश प्रधान यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. बुधवारी न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे.

बाबरी मशीद प्रकरणात न्यायालयाने यापूर्वी विश्व हिंदू परिषदेच्या पाच नेत्यांनाही जामीन मंजूर केला होता. महंत नृत्यगोपाल दास, महंत रामविलास वेदांती,  वैकुंठलाल शर्मा उर्फ प्रेमजी, चंपत राय बन्सल आणि धर्मदास हे सहा जण २० मेरोजी न्यायालयासमोर शरण आले होते.

डिसेंबर १९९२ मध्ये बाबरी मशीद पाडल्याच्या प्रकरणात दोन खटले दाखल करण्यात आले होते. सीबीआयने चौकशीनंतर या प्रकरणात एकूण ४९ आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर या प्रकरणाची लखनौतील सीबीआयच्या विशेष न्यायालयात सुनावणी सुरु आहे. याप्रकरणात न्यायालयाला दोन वर्षात निकाल द्यावा लागणार आहे. याप्रकरणात लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी,  उमा भारती यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांचा समावेश आहे.

[jwplayer 9xaU4cUi-1o30kmL6]

रामजन्मभूमी न्यासाचे सदस्य वेदांती यांनी एप्रिलमध्ये बाबरी मशीद पाडण्यात लालकृष्ण अडवाणी यांचा हात नसल्याचे म्हटले होते. बाबरी मशीद पाडण्यामध्ये आपण महत्वाची भूमिका निभावल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले होते. माझ्या सांगण्यावरून बाबरी मशीद पाडण्यात आल्याचा दावा वेदांती यांनी केला होता. तसेच मी फासावरही जाण्यास तयार असल्याचे ते म्हणाले होते. ज्या दिवशी बाबरी मशीद पाडण्यात आली, त्या दिवशी कारसेवकांनी वशिष्ठ भवनात येऊन आता काय करायचं, अशी विचारणा केल्याचे असे वेदांती यांनी सांगितले होते.

[jwplayer KjXK4bsx-1o30kmL6]