बाबरी मशीद पतन प्रकरणातील लालकृष्ण अडवाणी व मुरलीमनोहर जोशी यांच्यासह इतर आरोपींनी त्यांचे लेखी निवेदन दाखल करावे, असे सांगून सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी या प्रकरणाची सुनावणी दोन आठवडय़ांनी पुढे ढकलली.

या प्रकरणातील सर्व पक्षांना त्यांचा युक्तिवाद लेखी स्वरूपात ६ एप्रिलपर्यंत दाखल करण्यास सांगून न्या. पी.सी. घोष व न्या. आर.एफ. नरिमन यांच्या खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी ७ एप्रिलला निश्चित केली. बुधवारी न्या. नरिमन हे न्यायालयात हजर नसल्याने न्या. घोष यांनी सुनावणी एक दिवस पुढे ढकलली होती.

१९९२ साली अयोध्येतील रामजन्मभूमीवरील वादग्रस्त बाबरी मशीद पाडण्याशी संबंधित प्रकरणातून अडवाणी, जोशी व भारती यांच्यासह इतर आरोपींवरील कटाचा आरोप रद्द करण्याविरुद्धच्या अपिलावर सुनावणी करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने ६ मार्च रोजी घेतला होता.

रायबरेली येथील विशेष न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यात वरील तीन नेत्यांसह एकूण १३ व्यक्तींची बाबरी मशीद पाडण्याचा कट रचल्याच्या आरोपातून सुटका करण्यात आली होती. या आदेशाविरुद्ध सीबीआय व (आता मृत) याचिकाकर्ते हाजी महबूब अहमद यांनी अपील दाखल केले आहे.

राम मंदिरासाठी मुस्लिमांनी समर्थन द्यायला हवे : सुब्रमण्यम स्वामी

जमशेदपूर : भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी अयोध्या येथील रामजन्मभूमी-बाबरी मशीद विवादित जागेवरच राम मंदिर उभारण्यासाठी मुस्लीम समाजाने मदत करायला हवी असे आवाहन केले. रामजन्मभूमी-बाबरी मशीद वाद समोपचाराने सोडवावा असा सल्ला न्यायालयाने मंगळवारी दिला होता. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाने केलेल्या तपासाअंती सांगितलेल्या वादग्रस्त जागेवरच अयोध्येत राम मंदिर उभारले जाऊ शकत असल्याचे स्वामी यांनी सांगितले. भगत सिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना आंदराजली देण्यासाठी आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.  २००३ मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने मंदिराची रचना वादग्रस्त जागेवर सापडली असल्याचे स्पष्ट केले होते. मंदिर पाडल्यानंतर बाबरी मशिदीचे बांधकाम करण्यात आले असून हिंदू समुदाय राम मंदिर उभारण्याची मागणी भरपूर काळापासून करीत आहे.  सर्वसहमतीने हा वाद मिटविला गेला नाही, तर एप्रिल २०१८मध्ये राज्यसभेत बहुमत मिळविल्यावर राम मंदिर उभारणीसाठी कायदा लागू करणार असल्याचे स्वामी यांनी सांगितले. या प्रश्नावर सर्वसहमतीने तोडगा काढण्यासाडी मुस्लीम समुदायाने पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.