बाबरी मशीद प्रकरणात सीबीआयवर निशाणा साधल्यामुळे भाजप नेते विनय कटियार यांच्यावर पक्ष नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपने या वक्तव्यावरून विनय कटियार यांना समन्स बजावले आहेत. अशा प्रकारची वादग्रस्त वक्तव्ये करू नयेत, असा सल्ला कटियार यांना दिला आहे.

बाबरी मशीद प्रकरणात लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांच्यासह भाजपच्या इतर नेत्यांवर कट रचल्याचा खटला चालवण्याच्या निर्णयावर कटियार यांनी नाराजी व्यक्त करून सीबीआयवर टीकास्त्र सोडले होते. बाबरी मशीद पाडण्याचा कट कुणीही रचला नव्हता. या प्रकरणात कोणी कट रचत असेल तर ते सीबीआय आहे. सध्याच्या काळात सीबीआय मोकाट सुटलेल्या हिंस्त्र श्वापदासारखे वागत आहे. मुळात खटला नसतानाही सीबीआयने आमच्याविरुद्ध नवा खटला का रचला? यापूर्वी उच्च न्यायालयाने या प्रकरणात कोणालाही दोषी ठरवले नव्हते. मात्र, सीबीआयच्या माध्यमातून आमच्याविरुद्द कट रचण्यात आला. आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून तुरूंगात जाऊ. मात्र, आमच्यापैकी कुणीही बाबरी मशिद पाडली नव्हती, असे विनय कटियार यांनी म्हटले होते. तसेच राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या रिंगणातून लालकृष्ण अडवाणी यांना बाहेर काढण्यासाठी नरेंद्र मोदींनी कट रचल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी लालूप्रसाद यादव यांनी केला होता. या विधानाशी कटियार यांनी अप्रत्यक्षपणे सहमती दर्शविली होती. कदाचित लालूप्रसाद यादव यांच्या वक्तव्यात सत्यता असेल, मला याबाबत काहीच माहिती नाही, अशी सूचक प्रतिक्रिया त्यांनी दिली होती. त्यामुळे भाजपमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आला होता. कटियार यांच्या या वक्तव्यामुळे भाजप त्यांच्यावर नाराज आहे. भाजपचे महासचिव रामलाल यांनी या प्रकरणी विनय कटियार यांना समन्स बजावले. कटियार यांनी अशा प्रकारची वादग्रस्त वक्तव्ये करू नयेत, असे त्यांनी कटियार यांना सुनावल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.