‘एम७७७ होवित्झर’ तोफांची जोडणी करण्यासाठी भारतातील महिंद्र उद्योग समुहाची निवड करण्यात आल्याची घोषणा ‘बीएई सिस्टम’ या सुरक्षा, संरक्षण आणि अंतरिक्ष क्षेत्रात कार्यरत असलेल्या कंपनीने बुधवारी केली. १४५ तोफांची जोडणी आणि परिक्षण करण्यासाठीचा  प्रकल्प महिंद्र सुरू करणार असल्याचे ‘बीएई’ने एका निवेदनाद्वारे जाहीर केले.
‘बीएई’ ही बहुराष्ट्रीय कंपनी अमेरिकेत या तोफांची निर्मिती करते. भारत आणि अमेरिकेदरम्यान १४५ ‘एम७७७ होवित्झिर’ तोफा खरेदी करण्याबाबतची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. आपल्या युद्ध सामग्रीच्या माऱ्याची क्षमता उत्तम करण्याच्या प्रयत्नात असलेल्या भारताने ७० कोटी डॉलर्सपेक्षा अधिक रकमेचा हा करार केला आहे. भारतीय सैन्यदलाची युद्ध सामग्री समृध्द करण्याचे मनोगत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील व्यक्त केले आहे. परदेशी कंपन्या भारतात प्रकल्प उभारतील अशाप्रकारे करार व्हावेत असा पंतप्रधानांचा मानस आहे. असे केल्याने स्थानिक उद्योगाला चालना मिळण्याबरोबर तांत्रिक देवाण-घेवाण देखील समृध्द होईल.