प्रशासनातील लोकांच्या दगडाच्या काळजामुळे दाना माजीला आपल्या पत्नीचा मृतदेह खांद्यावरून १२ किलोमीटरपर्यंत घेऊन जाण्याची दुर्दैवी वेळ आली होती. काही दिवसांपूर्वी ओडिशामध्ये घडलेल्या या घटनेचे वृत्त माध्यमांत प्रसिद्ध होताच अनेकांचे हृदय पिळवटून निघाले. तर दगडाचे काळीज असलेल्या प्रशासनाच्या ढीम्म कारभारावर अनेकांनी टीकादेखील केली. असे असतानाच बहारीनचे पंतप्रधान प्रिन्स खलीफा बिन सलमान अल खलीफा यांना या दुर्दैवी घटनेबाबत समजताच ते अतिशय व्यथित झाले. एवढेच नव्हे तर या प्रसंगाला सामोरे जावे लागलेल्या माझीच्या कुटुंबाला आर्थिक सहाय्य करण्याची घोषणादेखील त्यांनी केली. गल्फ डेली न्यूजमधील वृत्तानुसार अॅम्ब्युलन्स अभावी आपल्या मृत पत्नीचे शव रुग्णालयातून १२ किलोमीटर खांद्यावर वाहून नेण्यऱ्या व्यक्तीचे वृत्त प्रिन्स खलीफा बिन सलमान अल खलीफा यांनी वाचले. हे वृत्त वाचून त्यांना अतिशय दु:ख झाले. या कुटुंबाला मदत करण्याची इच्छा त्यांच्या मनात निर्माण झाली. त्यामुळे लगेचच त्यांनी दाना माजीच्या कुटुंबास आर्थिक सहाय्य करण्याचा निर्णय घेतला. पंतप्रधानांच्या कार्यालयाने बहारीनमधील भारतीय दूतावासाच्या कार्यालयाशी संपर्क साधून आर्थिक मदतीचा निर्णय घेतल्याचे या वृत्तात म्हटले आहे. ही रक्कम किती आणि कधी देण्यात येईल याबाबत मात्र अद्याप खुलासा करण्यात आलेला नाही.
ओडिशामधील कालाहांडी जिल्ह्यात राहणारे दाना माझी यांची पत्नी टीबीने ग्रस्त होती. उपचारासाठी तिला भवानीपटना जिल्हा रुगणालयात नेण्यात आले होते. रुग्णालयातच तिचा मृत्यू झाला होता. पत्नीचा मृतदेह नेण्यासाठी दाना माझीला अॅम्ब्युलन्स मिळू शकली नाही. अॅम्ब्युलन्स न मिळाल्याने दानाला पत्नीचा मृतदेह चटई आणि चादरीत गुंडाळून मुलीसह १२ किलोमीटर खांद्यावर वाहून न्यावा लागला होता. पत्नीचा मृतदेह खांद्यावर घेऊन जाणाऱ्या माझीचे छायाचित्र आणि व्हिडिओ माध्यमांत प्रसिध्द झाल्यावर अनेकांनी या दुर्दैवी घटनेबाबत दु:ख व्यक्त करत संताप प्रकट केला.

dm-1