बलोच राष्ट्रवाद्यांनी भारतीय अमेरिकी लोकांच्या समवेत पाकिस्तानच्या वाणिज्यदूतावासासमोर पाक पुरस्कृत दहशतवादाविरोधात निषेध आंदोलन केले. पाकिस्तानमधील मानवी हक्कांचे उल्लंघन, अपहरण व नागरिकांचे मृत्यू, तसेच महिलांवरील बलात्कार या मुद्दय़ांवर भर देणारे फलक निदर्शकांकडे होते. त्यांनी उरी येथील हल्ला म्हणजे पाकिस्तानचे भ्याड कृत्य होते अशा शब्दात निषेध केला.

अमेरिकन फ्रेंड्स ऑफ बलोचिस्तानचे कार्यकर्ते, भारतीय अमेरिकी लोक यात सहभागी झाले होते. पाकिस्तानात अल्पसंख्याकांची दडपशाही, महिला व मुले यांच्यावर अत्याचार या बाबींचा या वेळी निषेध करण्यात आला. अमेरिकेने पाकिस्तानला मदत करणे थांबवावे, अशी मागणी यात करण्यात आली. इव्ही लीग ऑफ टेररिझम असे लिहिलेला फलक निदर्शकांच्या हातात होता. दोन दिवसांपूर्वी भारताच्या संयुक्त राष्ट्रांमधील स्थायी दूतावासाच्या प्रथम सचिव  एनम गंभीर यांनी असे म्हटले होते की, ज्या पाकिस्तानात प्राचीन शिक्षणाचे केंद्र असलेल्या तक्षशिलासारख्या विद्यापीठाचा वारसा लाभला तो देश आता ‘इव्ही लीग ऑफ टेररिझम’ बनला आहे. अमेरिका व भारत यांच्या राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता झाली. जैश ए महंमद या प्रतिबंधित दहशतवादी गटाने काश्मीरमधील उरी येथे लष्करी तळावर केलेल्या हल्ल्यात भारताचे १८ जवान हुतात्मा झाले होते. या हल्ल्यात पाकिस्तानी लष्कर व आयएसआय यांचा हात असल्याचा आरोप करतानाच पाकिस्तानने पुकारलेले हे अघोषित युद्धच आहे, असे कार्यकर्ते अचलेश अमर यांनी सांगितले.

काँग्रेस सदस्य व काँग्रेसच्या दहशतवाद उपसमितीचे अध्यक्ष टेड पो व काँग्रेस सदस्य डॅना रोराबॅचर यांनी प्रतिनिधिगृहात पाकिस्तानला दहशतवादाचा पुरस्कार करणारा देश म्हणून घोषित करण्याची तरतूद असलेले विधेयक मांडले होते.  विश्वासघात करणाऱ्या पाकिस्तानला मदत करणे तर थांबवले पाहिजेच, शिवाय त्याला दहशतवादाचा पुरस्कार करणारा देश जाहीर करावे, असे पो यांनी विधेयकात म्हटले होते.