पाकपासून वेगळे होण्यासाठी बलुची जनतेचा चिकाटीने लढा चालू आहे. बुधवारी याची पुन्हा एकदा प्रचिती आली. मात्र यावेळी बलुचिस्तानच्या धर्तीवर तिरंगा आणि मोदींचे फोटो झळकल्यामुळे पाकिस्तानला जोरदार धक्का बसण्याची शक्यता आहे. बलुची ‘स्वातंत्र्य चळवळी’तील नेत्यांनी केलेल्या अंदोलनात मोदींच्या फोटोसोबत तिरंगा फडकविण्यात आला. तर पाकिस्तान विरोधात घोषणाबाजी करत पाकिस्तानच्या राष्ट्रध्वजाला पायदळी तुडविण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या चार दिवसांपासून बलुचिस्तानमध्ये पाकिस्तान विरोधात आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. यावेळी मुक्तीची मागणी करताना बलुची स्वतंत्र लढ्यातील नेत्यांनी बलुचीचे स्वातंत्र्य सेनानी अकबर बुक्ती यांच्या फोटोसह मोदींचे फोटो झळकावून आंदोलन करण्यात आले. भारताच्या स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान मोदी यांनी बलुचिस्तानच्या मुद्याला थेट हात घातला होता. लाल किल्ल्यावरून बलुचिस्तानाचा उल्लेख करण्याच्या धाडसी निर्णयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे बलुचिस्तानमध्ये देखील  वारे वाहत असल्याचे चित्र या आंदोलनात दिसून आले. पंतप्रधानांच्या बलुचीस्थानच्या वक्तव्यानंतर पाकिस्तानने भारतीय पंतप्रधानांनी लाल रेषा ओलांडली असल्याचे म्हटले होते. तसेच बलुची नेत्यांना भारताकडून रसद पुरविली जात असल्याचा वेळोवेळी पाकिस्तानकडून करण्यात आला आहे.