दक्षिण आशियातील भारत व पाकिस्तान या दोन अण्वस्त्रधारी देशांनी त्यांच्यातील तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांनी थेट संवाद साधावा, असे आवाहन संयुक्त राष्ट्रांचे महासचिव बान की मून यांनी केले आहे. दोन्ही देशातील संरक्षण सल्लागार पातळीवरील चर्चा रद्द झाल्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
बान यांचे प्रवक्ते स्टीफनी डय़ुजॅरिक यांनी सांगितले की, भारत व पाकिस्तान यांच्यातील घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. महासचिवांच्या मते दोन्ही देशातील तणाव टाळण्यासाठी थेट संवादावर भर देणे आवश्यक आहे.
भारत व पाकिस्तान या दोन्ही बाजूंकडे नागरी प्राणहानी झाली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या लष्करी निरीक्षक गटाला दोन्ही देशातील स्थितीची कल्पना आहे का असे विचारले असता त्यांनी सांगितले की, त्याबाबतच्या बातम्या आम्ही बघितल्या आहेत व निरीक्षक गटाकडून त्याबाबत मार्गदर्शक मुद्दय़ांची आम्ही वाट पाहात आहोत.
संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख बान की मून यांनी दोन्ही देशातील संरक्षण सल्लागार पातळीवरील चर्चा रद्द केल्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. दोन्ही देशातील नेत्यांनी संवादाच्या सर्व संधींचा वापर केला पाहिजे. पाकिस्तानी रेंजर्सनी अलीकडेच केलेल्या गोळीबारात आर. एस. पुरा व अर्णिया भागात तीन ठार व १७ जण जखमी झाले होते.
‘भारतातील लोकशाही संवेदनशील’
संयुक्त राष्ट्रे – भारतातील लोकशाही संवेदनशील आहे, तिच्यात एक जिवंतपणा जाणवतो तसेच हे सगळे साध्य करण्यात संसदेचा मोठा वाटा आहे, असे संयुक्त राष्ट्रांचे महासचिव बान की मून यांनी सांगितले.
लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्याशी चर्चेनंतर त्यांनी भारतात महिला हक्कांचे रक्षण व लिंगभाव समानतेच्या मुद्दय़ावर होत असलेल्या कामाचे कौतुक केले. महाजन व राज्यसभेचे उपाध्यक्ष पल्लथ जोसेफ कुरियन यांच्याशी त्यांनी चर्चा केली. महिलाविरोधी हिंसाचार व त्याविरोधातील उपाययोजनात संसदेने सजग भूमिका पार पाडली आहे, असे बान की मून यांनी या बैठकीत सांगितले आहे. हवामान बदलांवर करार, शाश्वत विकासाचा कार्यक्रम या मुद्दय़ांवरही चर्चा झाली. महाजन या संसद अध्यक्षांच्या चौथ्या जागतिक परिषदेसाठी येथे आल्या आहेत. संसद अध्यक्षांनी संसदीय समित्या व इतर पदांवर महिलांची नेमणूक करून त्यांचा सहभाग वाढवला पाहिजे असे महाजन यांनी त्या परिषदेत सांगितले होते. लिंगभाव समानतेच्या मुद्दय़ावर सभागृहातील चर्चेला अधिक वेळ दिला गेला पाहिजे असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.