राजकारणातील कट्टर विरोधक असलेल्या समाजवादी पक्षाने खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावरील बंदीच्या मुद्द्यावरुन चक्क शिवसेनेची साथ दिली आहे. खासदारावरील हवाई प्रवासबंदीच्या कारवाईवरुन विमान कंपन्यांची दादागिरी दिसून येते असे समाजवादी पक्षाचे खासदार नरेश अग्रवाल यांनी म्हटले आहे.

इकॉनॉमी श्रेणीमध्ये बसविल्याच्या रागातून एअर इंडियाच्या व्यवस्थापकाला चपलीने मारहाण करणारे उस्मानाबादचे शिवसेना खासदार प्रा. रवींद्र गायकवाड सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरले आहेत. साठ वर्षाच्या कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्या गायकवाड यांच्यावर टीका होत आहे. पण शिवसेनेने गायकवड यांच्यावर कारवाई करण्याऐवजी त्यांची पाठराखण केली आहे. तर अन्य पक्षांचे खासदारही गायकवाड यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरले आहेत.

खासदार गायकवाड यांच्यावर हवाई प्रवासबंदी घालण्याचा निर्णय एअर इंडियासहित भारतीय विमान कंपन्यांच्या महासंघाने (फेडरेशन ऑफ इंडियन एअरलाइन्स : ‘एफआयए’) घेतला आहे. सोमवारी संसदेत खा. गायकवाड यांच्यावरील हवाईप्रवास बंदीच्या कारवाईचे पडसाद उमटले. शिवसेनेने हा मुद्दा संसदेत मांडल्यावर अन्य पक्षांचे खासदार शिवसेनेच्या समर्थनार्थ मैदानात उतरले. राज्यसभेत समाजवादी पक्षाचे खासदार नरेश अग्रवाल यांनी बंदीच्या कारवाईचा विरोध दर्शवला. खासदारावरील कारवाईवरुन विमान कंपन्यांची दादागिरीच दिसते असे ते म्हणालेत. नागरी विमान वाहतूक खात्याचे मंत्री अशोक गजपती राजू यांनी राजीनामाच द्यावा अशी मागणीही त्यांनी केली. ऐरवी एकमेकांविरोधात लढणारे खासदार स्वत:च्या हक्कांसाठी एकत्र आले आहेत.

नागरी विमान वाहतूक खात्याचे मंत्री अशोक गजपती राजू यांनी खा. गायकवाड यांच्यावरील कारवाईवर संसदेत उत्तर दिले. नियम हे सर्वांसाठीच समान आहे असे राजू यांनी स्पष्ट केले. हवाई वाहतुकीदरम्यानच्या सुरक्षेसाठी आपल्याकडे कठोर नियम आहे. पण या नियमांच्या कचाट्यात खासदार अडकेल असे स्वप्नातही वाटले नव्हते असे त्यांनी सांगितले. संसदेत खासदार गायकवाड यांच्यावरील बंदीचा मुद्दा गाजत असतानाच दुसरीकडे उस्मानाबादमध्ये गायकवाड यांच्या समर्थनार्थ सोमवारी बंदची हाक देण्यात आली होती.