अगदी कठीण तांत्रिक समस्या असली तरी भारतीय माणूस काहीतरी खटपट करून स्वत:च त्यावर तोडगा काढतो. म्हणूनच भारतीय ‘जुगाड’ असल्याचे म्हटले जाते. याच ‘जुगाड’ प्रतिभेवर आता सरकारी मोहोर लागणार आहे. अत्यंत कमी संसाधनांमध्ये तंत्रउपकरणांचा ‘जुगाड’ करून प्रतिकूल परिस्थितीवर मात करणाऱ्या नवप्रवर्तक कल्पनांची ‘बँक’ तयार करण्याचा निर्णय केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाने घेतला आहे. या अभिनव उपक्रमाचे उद्घाटन येत्या १४ ऑगस्ट रोजी माजी राष्ट्रपती व मिसाइल मॅन एपीजे अब्दुल कलाम यांच्या हस्ते होणार आहे.
भारताच्या विकास प्रक्रियेत ‘सब का साथ’ घेण्यासाठी हा प्रयोग नितीन गडकरी यांच्या अखत्यारित असणारे केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालय करणार आहे. ग्रामीण भागात बऱ्याचदा कुशल तंत्रज्ञान नसताना काहीतरी खटपट करून छोटय़ा अडचणींवर समाधान शोधले जाते. हे करणारा पुरेसा सुशिक्षितही नसतो. पण तरीही पाणीपुरवठा, स्वच्छता, पडीक जमिनीचा विकास, पेरणी, नांगरणी करण्यासाठी उपलब्ध अपुऱ्या साधनांमध्ये व्यवस्थित काम करणारी यंत्रणा तयार केली जाते. याचा लाभ स्थानिक स्तरावर होतो. पण अशा तंत्रज्ञानाची नोंद कुठेच होत नाही. उलट ‘जुगाड’ म्हणून भारतीयांना हिणवले जाते. अशा नवप्रवर्तक प्रयोगांची एकत्रित माहिती केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयात संकलित केली जाणार आहे. ज्यास ‘बँक ऑफ आयडिया अ‍ॅण्ड इनोव्हेशन’ – नवकल्पनाकोष असे नाव देण्यात आले आहे. देशभरातून प्रयोगांची माहिती संकलित केली जाईल. या कल्पनांची सर्वव्यापी व्यवहार्यता तपासून पाहण्यात येईल. त्यानंतर ही कल्पना राष्ट्रीय स्तरावर राबविण्यासाठीवस्तृत योजना आखली जाणार आहे. नवप्रवर्तक कल्पनेची वा तंत्रज्ञानाची व्याप्ती व व्यवहार्यता तपासण्यासाठी पुण्याच्या आय फोर सी या संस्थेची मदत घेण्यात येणार असल्याचे ग्रामीण विकासमंत्र्यांचे मानद सल्लागार डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी सांगितले.  संकलित करण्यात आलेल्या प्रयोगांची व्यवहार्यता या संस्थेच्या माध्यमातून तपासण्यात येईल. ज्यामुळे सरकारी पातळीवर अंमलबजावणीत अडचणी येणार नाहीत. प्रतिभावान लोकांना प्रोत्साहन देणारी ‘नवकल्पनांची बँक’ म्हणजे चौकटीबाहेरचा प्रयोग असल्याचे सहस्रबुद्धे म्हणाले.
आय फोर सीचे डॉ. अभय जेरे म्हणाले की, भारतीय युवकांची नवकल्पना, प्रतिभाशक्ती देशाच्या विकासासाठी कशी वापरता येईल, याचा विचार होणे गरजेचे आहे. आय फोर सी संस्था त्यासाठी काम करते. एखाद्या कल्पनेची वास्तविकता पडताळून अंमलबजावणी करणे हे संस्थेचे प्रमुख काम आहे.

बऱ्याचदा असे प्रयोग छोटय़ा स्तरावर राबवले जातात. त्यास सरकारी यंत्रणेचे समर्थन मिळत नाही. या प्रयोगांची एकत्रित माहिती नसते. त्यासाठी मंत्रालयात नवकल्पनाकोष विभाग सुरू करण्यात येईल. प्रयोग करणाऱ्यांशी संपर्क करणे, चर्चा करण्याचे काम या विभागाचे असेल.
– डॉ. विनय सहस्त्रबुद्धे,
ग्रामीण विकासमंत्र्यांचे मानद सल्लागार