बँकिंग क्षेत्रात सुचवलेल्या सुधारणांमुळे काही अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्याचबरोबर बँक कर्मचाऱ्यांच्या इतर अनेक वादांच्या पार्श्वभूमीवर देशभरातील १० लाख बँक कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. त्यामुळे येत्या २२ ऑगस्ट रोजी देशभरातील सर्व बँका बंद असणार आहेत.

युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (यूएफबीयू) ची इंडियन बँक्स असोसिएशन (आयबीए), चीफ लेबर कमिशनर आणि दि डिपार्टमेंट ऑफ फायनान्शिअल सर्विसेस (डीएफएस) यांच्यामध्ये शुक्रवारी बँक कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात चर्चा झाली. ही चर्चा निष्फळ ठरल्याने संपाचे हत्यार उपसण्यात आल्याचे संघटनेच्या नेत्यांनी सांगितले आहे.

‘यूएफबीयू’ मध्ये भारतीय बँकिंग क्षेत्रातील ९ संघटनांचा समावेश आहे. ‘यूएफबीयू’ ने देशभरात बँकिंग क्षेत्रातील सुधारणांविरोधात संप जाहीर केला आहे. सार्वजनिक बँकांचे तत्काळ खासगीकरण होणार नाही. त्यामुळे फोरमने संप मागे घ्यावा असे आवाहन ‘आयबीएफ’ आणि ‘डीएफएस’च्या अधिकाऱ्यांनी केले आहे.

तर चर्चेतून अद्याप समाधानकारक तोडगा निघालेला नाही, असे ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कन्फेडरेशन (एआयबीओसी) चे सरचिटणीस राजेंद्र देव यांनी सांगितले. त्यामुळे संपाचा निर्णय घेण्यात आला असून देशभरातील बँकांच्या १ लाख ३२ हजार शाखांमधील एकूण १० लाख बँक कर्मचारी २२ ऑगस्ट रोजी संपावर जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.