पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर काळा पैसा पांढरा करण्यात मदत करणाऱ्या बँक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कडक शब्दांत संदेश दिला आहे. ८ नोव्हेंबरनंतर ज्या कुणी व्यक्तींनी पाप केले, त्यांना सोडणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमधील बनासकांठा येथील भाजपच्या सभेत म्हणाले. सरकार भ्रष्टाचाऱ्यांच्या मागे लागले आहे. काळा पैसा पांढरा करण्यास मदत करणाऱ्या बँकेच्या अधिकाऱ्यांना आणि संबंधित लोकांना तुरुंगात पाठवले आहे. त्यांना वाटले होते की, मागच्या दरवाजाने ते आपले काम साधू शकतात. पण त्यांना माहिती नाही की मोदींनी त्या दरवाजातही कॅमेरे लावले आहेत, असेही त्यांनी सांगितले.

नोटाबंदीच्या निर्णयाने सध्यातरी काही फायदा होणार नाही, असे सांगणाऱ्या विश्लेषकांनाही मोदींनी कडक शब्दांत सुनावले. अनेक बुद्धीमान लोक भाषणबाजी करत आहेत. या निर्णयामुळे जिवंतपणी कोणताही फायदा होणार नाही, मेल्यानंतरच याचा फायदा होईल, असे ते सांगत आहेत. त्यांची तुलना मोदींनी चार्वाक मुनी यांच्याशी केली आहे. मृत्यूनंतर काय होणार आहे, काय माहिती?, आताच तूप पिऊन मौज करा, असे मूनी सांगत होते, असा दाखलाही मोदींनी दिला. चार्वाक यांचे सिद्धांत देशाने कधीच स्वीकारलेले नाहीत, असेही मोदींनी सांगितले. गरीब आई-वडील पैसे नसले तर संध्याकाळी स्वयंपाकच करत नाहीत, असा हा देश आहे. पैसे वाचले तर, मुलांसाठी उपयोगी पडतील. माझा देश स्वार्थी लोकांचा देश नाही, असेही त्यांनी सांगितले.

पंतप्रधान मोदी यांनी नोटाबंदीमुळे लोकांना होणाऱ्या त्रासाबद्दलही भाष्य केले. हा निर्णय खूपच कठिण आहे, हे पहिल्यापासून सांगत आलो आहे. मी सांगितले होते की, खूप त्रास होईल, अडचणी येतील. पण त्या ५० दिवसांसाठीच आहेत. यादरम्यान त्रासात वाढ होईल, पण ५० दिवसांनंतर हळूहळू परिस्थिती सुधारेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, यापूर्वी अर्थमंत्री अरुण जेटली यांनीही काळा पैसा पांढरा करणाऱ्यांना इशारा दिला होता.