अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी पदभार सोडला असला, तरी त्यांच्या लोकप्रियतेचा करिष्मा कमी होताना दिसत नाही आहे. याचाच प्रत्यय फ्रान्समध्ये आला असून येथील जनतेला ओबामा चक्क त्यांचे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून हवे आहेत. फ्रान्समध्ये सध्या निवडणुकांचे वारे वाहात असून देश नव्या राष्ट्राध्यक्षांच्या शोधात आहे. त्याचबरोबर देशात राष्ट्रपती निवडीबाबत चाललेल्या गोंधळामुळे लोकांचा निवडणुकीमधील रस कमी होत असल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीला तोंड देण्यासाठी एक अकल्पित व असंभाव्य युक्ती शोधून काढण्यात आली आहे. ‘ओबामा२०१७’ संकेतस्थळाने अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी फ्रान्सचे नवे राष्ट्राध्यक्ष व्हावे यासाठी याचिका तयार केली आहे. तसेच जनतेला या याचिकेला समर्थन देण्यासाठी स्वाक्षरी करण्याचे जाहीर आवाहन केले आहे. दरम्यान या संकेतस्थळाला फ्रान्सवासीयांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत २७,००० लोकांनी या याचिकेवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

ओबामा यांनी २० जानेवारी रोजी अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्ष पदाचा त्याग केला. रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प सध्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. ‘‘ओबामा यांनी दोन वेळा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाचा भार सांभाळला असून त्यांना फ्रान्सच्या राष्ट्रध्यक्षपदी का नेमू नये? देशात पुरोगामी बदल करण्यास तयार असून तसाच एक पुरोगामी प्रस्ताव आम्ही त्यांना देत आहोत,’’असे या संकेतस्थळाचे म्हणणे आहे.

संकेतस्थळाच्या निर्मात्यापैकी एकाने एनपीआरशी बोलताना सांगितले की, ‘‘नावडत्या उमेदवाराविरोधात मत देण्याऐवजी, आवडत्या उमेदवारासाठी मत देणे नक्कीच सकारात्मक असेल. ओबामा यांच्या नावाचा विचार हा त्यातूनच आला. या विचाराची निर्थकता आम्हाला माहीत आहे. ओबामा हे फ्रान्सचे नागरिक नसून त्यांना फ्रेंच भाषा देखील बोलता येत नाही. या प्रयत्न निव्वळ गमंत असून यामागे जनतेला फ्रान्सच्या राजकारणात बदल घडवून आणण्यासाठी जागरूक करणे हे आहे.

अमेरिकेचे नवे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची वादग्रस्त विधानं व त्याच्या ढासळत्या लोकप्रियतेचा आलेख पाहता बहुतांश लोकांना त्यांचे नेतृत्व पचणी पडत नसल्याचे दिसत आहे. अमेरिकेतील एका सर्वेक्षणानुसार बराक ओबामा यांनीच पुन्हा राष्ट्राध्यक्ष पद सांभाळावे असे तेथील बहुतांश लोकांचे मत आहे.