पनामा येथे सर्व पाश्चिमात्य नेत्यांची महत्त्वपूर्ण भेट होत असून त्यामध्ये अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा व क्युबाचे अध्यक्ष रौल कॅस्ट्रो यांचीही चर्चा होणार आहे. अमेरिका आणि क्युबा यांच्यात जवळजवळ अर्धशतकानंतर पुन्हा राजनैतिक संबंध प्रस्थापित होण्याची दाट चिन्हे दिसत आहेत.
शीतयुद्धाच्या काळात या दोन देशांचे संबंध कमालीचे तणावपूर्ण झाले. हे संबंध एवढय़ा टोकाला गेले की, उभय देशांचे नेते कधी समोरासमोर आले तरी त्यांच्यात औपचारिक स्मितहास्यही दुर्मीळ झाले होते. या पाश्र्वभूमीवर ओबामा आणि कॅस्ट्रो यांच्या भेटीला महत्त्व आले आहे.
 या नेत्यांची औपचारिक भेट ठरविण्यात आलेली नाही. परंतु उभयतांचे हस्तांदोलन किंवा अल्पकाळ भेटही उभय देशांमधील गेल्या काही दशकांचा कटू भूतकाळ विसरण्यास साह्य़भूत ठरू शकते, असे राजनैतिक तज्ज्ञांचे मत आहे. हे दोन्ही देश भूतकाळातील मतभेद गाडून नव्याने संबंध प्रस्थापित करू इच्छितात की नाही, याकडेही सर्वाचे लक्ष लागले आहे.
विशेष म्हणजे, ओबामा आणि कॅस्ट्रो या दोघांनीही चारच महिन्यांपूर्वी राजनैतिक संबंध पुन्हा प्रस्थापित करण्याची घोषणा केली होती.