वांशिक बहुविधतेचा पुरस्कार करीत येत्या काळात अमेरिकाचा राष्ट्राध्यक्ष हिंदू, ज्यू किंवा लॅटीन वंशाचा झालेला पाहायला आवडेल असे अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांनी म्हटले आहे. भविष्यामध्ये अमेरिकामध्ये सर्वांना समान संधी मिळतील, वंश, रंग आणि धर्म यांच्या भिंती संपुष्टात येऊन अमेरिका हे एक शक्तीशाली राष्ट्र होईल असे अशी आशा आपण व्यक्त करतो असे ओबामांनी म्हटले. बराक ओबामांची ही अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष म्हणून शेवटची पत्रकार परिषद होती.

भविष्यात गुणवत्तेच्या आधारावर सर्वांना संधी मिळावी असे ते यावेळी म्हणाले. जर असे झाले तर एखादी महिला या देशाची राष्ट्राध्यक्ष होऊ शकेल. तसेच हिंदू, ज्यू आणि लॅटीन वंशांचीही व्यक्ती राष्ट्राध्यक्ष होईल असे ते म्हणाले. येत्या काळात आपल्या देशातील वांशिक बहुविधता इतकी प्रगल्भ व्हायला हवी की कोण कुठल्या वंशाचा आहे याचा विसर देखील आपल्याला पडायला हवा असे ते म्हणाले. येत्या काळात पुन्हा कृष्णवर्णीय व्यक्ती या देशाची राष्ट्राध्यक्ष होऊ शकेल का असे त्यांना विचारण्यात आले होते. त्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी म्हटले की केवळ कृष्णवर्णीयच नव्हे तर सर्व वंशाच्या व्यक्तींना ही संधी मिळायला हवी. गुणवत्तेच्या आधारे ही संधी त्यांना मिळायला हवी असे देखील त्यांनी स्पष्ट केले. जर सर्वांना समान संधी मिळाली आणि त्यांना योग्य वातावरण मिळाले तर केवळ गुणवत्ताधारकच या स्पर्धेत टिकतील आणि आपल्या देशाला चांगले नेतृत्व मिळू शकेल असे ते म्हणाले.

बराक ओबामांनी हे समजावून सांगण्यासाठी ब्राझील ऑलिम्पिकमध्ये अमेरिकेने केलेल्या कामगिरीची उदाहरण दिले. ब्राझीलला देशातून गेलेल्या खेळाडूंमध्ये सर्व प्रकारच्या खेळाडूंचा समावेश होता. सायमन बाइल्स आणि मायकेल फेल्प्स हे दोघे वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आले परंतु दोघांनीही देशाची मान उंचावली असे ओबामा म्हणाले. २००८ मध्ये बराक ओबामा हे प्रथम राष्ट्राध्यक्ष बनले आणि त्यांनी इतिहास रचला. त्यानंतर ते २०१२ मध्ये पुन्हा निवडून आले. त्यांना नोबेल शांतता पुरस्कारही मिळाला आहे. २० जानेवारी रोजी डोनाल्ड ट्रम्प हे राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेणार आहेत.