भारताला संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळाचे स्थायी सदस्यत्वासाठीच्या उमेदवारीस अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी पाठिंबा दिला आहे, असे व्हाइट हाऊसने म्हटले आहे. व्हाइट हाऊसचे प्रवक्ते जॉश अर्नेस्ट यांनी सांगितले, की भारताला संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळाचे स्थायी सदस्यत्व देण्यास अमेरिकेचा पाठिंबा आहे. सुरक्षा मंडळात इतरही काही सुधारणा अपेक्षित आहेत. संयुक्त राष्ट्र संघटनेत केल्या जाणाऱ्या सुधारणा काय आहेत व त्या नेमक्या केव्हा केल्या जाणार आहेत, याबाबत आपल्याला माहिती नाही.
गेल्या महिन्यात अमेरिकेचे अध्यक्ष ओबामा भारतात आले होते, त्या वेळी त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळात भारताला स्थायी सदस्यत्व देण्याचा पुनरुच्चार केला होता. अर्नेस्ट यांनी सांगितले, की यापुढील काळाचा विचार करता संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळात सुधारणा केल्या जातील व त्यात भारताला स्थायी सदस्यत्व देण्यात येईल, अशी शक्यता ओबामा यांनी संसदेतील भाषणात बोलून दाखवली होती.