अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी मंगळवारी आपल्या भाषणामध्ये हिंदीतील डायलॉग सांगत उपस्थितांची वाहवा मिळवली. निवडक मान्यवर आणि विद्यार्थ्यांशी ओबामा यांनी दक्षिण दिल्लीतील सिरी फोर्ट सभागृहात संवाद साधला. अत्यंत उत्स्फूर्तपणे केलेल्या भाषणाच्या सुरुवातीलाच ओबामा यांनी  सर्वांना ‘नमस्ते’ केला.
गेल्यावेळी भारत भेटीवर आलो, त्यावेळी इथल्या काही कार्यक्रमांमध्ये मी आणि मिशेल यांनी नाचण्याचाही आनंद घेतला होता, अशी आठवण सांगून ओबामा म्हणाले, यावेळी तशी संधी मिळाली नाही. सॅनोरिटा, बडे बडे देशों में… मला काय म्हणायचे आहे, ते तुम्हाला कळले असेलच, असे त्यांनी म्हणताच उपस्थितांनी टाळ्या वाजवून त्यांना दाद दिली.
गेल्या भारत भेटीवेळी मुंबईमध्ये दिवाळीच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्याची आठवणही सांगून त्यानंतर व्हाईट हाऊसवरही दिवाळी साजरी केल्याचे ओबामा यांनी सांगितले.
प्रजासत्ताक दिनाच्या संचलनामध्ये सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी बुलेटवरून केलेल्या चित्तथरारक कसरती आपल्याला विशेष आवडल्याचे ओबामा यांनी सांगितले. त्याचवेळी बुलेटवरून फिरण्याची माझी इच्छा होती. मात्र, आपल्या सुरक्षारक्षकांनी त्याला परवानगी दिली नाही, असेही ओबामा म्हणाले.