व्हाइट हाऊसचे स्पष्टीकरण
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवडय़ात अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार असून त्यांच्याशी सुरक्षा आणि संरक्षण सहकार्य, आर्थिक प्राधान्यक्रम आणि हवामान बदल याबाबत अध्यक्ष बराक ओबामा चर्चा करणार आहेत, असे व्हाइट हाऊसच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
मोदींच्या या भेटीमुळे भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध अधिकाधिक दृढ होणार आहेत. ओबामा जानेवारी २०१५ मध्ये भारतभेटीवर आले होते तेव्हापासून दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ झाले होते, असे व्हाइट हाऊसच्या माध्यम सचिव जेनिफर फ्रीडमन यांनी सांगितले.
हवामान बदल आणि स्वच्छ ऊर्जा भागीदारी, सुरक्षा आणि संरक्षण क्षेत्रातील सहकार्य आणि आर्थिक प्राधान्यक्रम यामध्ये कितपत प्रगती झाली, त्याचा आढावाही या वेळी घेण्यात येणार आहे, असे फ्रीडमन म्हणाल्या.
येत्या ६ जून रोजी मोदी वॉशिंग्टनला येणार असून हा त्यांचा अमेरिकेचा चौथा दौरा आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे ७ जून रोजी मोदी आणि ओबामा यांची भेट होणार आहे, तर ८ जून रोजी अमेरिका काँग्रेसच्या संयुक्त सभेत त्यांचे भाषण होणार आहे.