अमेरिकेतील ९/११ च्या दहशतवादी हल्ल्यात मारल्या गेलेल्या लोकांना सौदी अरेबियावर खटला भरण्यास परवानगी देण्याची तरतूद असलेले विधेयक अध्यक्ष बराक ओबामा यांनी फेटाळले आहे. सौदी अरेबियावर खटले भरण्याची परवानगी दिली तर त्याचे वाईट परिणाम अमेरिकेच्या हितसंबंधांवर होतील, असे कारण हे विधेयक नाकारताना देण्यात आले आहे. जस्टिस अगेन्स्ट स्पॉन्सर्स ऑफ टेररिझम अॅक्ट बिल रिपब्लीकनांचे बहुमत असलेल्या काँग्रेसमध्ये दोन्ही सभागृहात मंजूर झाले होते, पण त्या विधेयकास मान्यता दिले तर दीर्घकालीन आंतरराष्ट्रीय तत्त्वांचे उल्लंघन होऊ शकते व अमेरिकेचे परदेशातील हितसंबंध धोक्यात येऊ शकतात, असे ओबामा यांनी काल सांगितले. अमेरिकी परराष्ट्र सार्वभौम संरक्षण कायद्यातील तत्त्वांचे या विधेयकामुळे उल्लंघन होऊ शकते व सर्वच देशांना न्यायिक प्रक्रियेपासून असलेले संरक्षण धोक्यात येऊ शकते किंवा काढले जाऊ शकते. काही खासगी पक्षकारांनी केलेल्या आरोपांमुळे हे घडणे योग्य ठरणार नाही. अमेरिकेत जो दहशतवादी हल्ला झाला होता त्यात सौदी अरेबियातील दहशतवादी गटांचा हात होता असे सांगण्यात येते. अपूर्ण माहितीच्या आधारे दीर्घकालीन परिणाम घडवणारे निर्णय घेण्यासारखा हा प्रकार विधेयक मंजूर केल्यास होईल. एखादी परकीय शक्ती दहशतवादी हल्ल्यांमागे असल्याबाबतच्या आरोपाआधारे असे विधेयक मंजूर करणे शहाणपणाचे नाही. अमेरिकी अध्यक्षांनी सांगितले की, संबंधित विधेयक हे प्रदीर्घ काळ चालत असलेल्या आंतरराष्ट्रीय तत्त्वांना हरताळ फासणारे आहे, त्यात सार्वभौमत्वाचे संरक्षण धोक्यात येईल. ते नियम जगभर लागू केले तर अमेरिकेचे आंतरराष्ट्रीय हितसंबंध धोक्यात येतील. विधेयक मान्य केल्यास अमेरिकेच्या मित्र देशांवरचे किरकोळ आरोपही ग्राह्य़ धरले जाऊ शकतात. व्हाइट हाउसचे प्रवक्ते जोश अर्नेस्ट यांनी सांगितले की, ओबामा यांना या विधेयकाच्या दीर्घकालीन परिणामांची चिंता होती, कारण त्यामुळे अमेरिकेचे हितच धोक्यात आले असते. ओबामा यांनीच ओसामा बिन लादेनला ठार मारण्याच्या मोहिमेचे आदेश दिले होते. ग्राउंड झिरो या हल्ल्याच्या ठिकाणी काम केलेल्या कर्मचाऱ्यांना आरोग्य विमा दिला होता. अमेरिकेतील काही रिपब्लिकनांचा विरोध असताना त्यांनी हे निर्णय घेतले होते.